For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमध्ये हंगामातील पहिली हिमवृष्टी

06:51 AM Oct 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमध्ये हंगामातील पहिली हिमवृष्टी
Advertisement

गुलमर्ग, सोनमर्गमधील पर्वतरांगांवर ‘पांढरी चादर’

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

काश्मीरमध्ये शुक्रवारी हंगामातील पहिली हिमवृष्टी झाली. या हिमवृष्टीमुळे गुलमर्ग, सोनमर्ग आणि गुरेझमधील पर्वतीय शिखरे पांढरी शुभ्र झाल्याचे निदर्शनास येत होते. येथील पर्वतीय भागांमध्ये उंचावर बर्फवृष्टी झाली असली तरी श्रीनगरसह इतर मैदानी भागात हलका पाऊस पडत आहे. हवामान विभागाने गुरुवारी जम्मू काश्मीरमध्ये 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. या अंदाजाप्रमाणे हिमवृष्टी आणि पाऊस झाल्याने पर्यटक आणि स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

काश्मीरमधील लोकप्रिय स्कीइंग डेस्टिनेशन असलेल्या गुलमर्गमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली. हंगामाच्या इतक्या लवकर बर्फवृष्टी पाहणे भाग्यदायी असल्याचे मत अनेक पर्यटक आणि स्थानिकांनी व्यक्त केले. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथेही शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. हिमाचलच्या धौलाधर पर्वतरांगांमध्ये गुरुवारी रात्री हलकी बर्फवृष्टी झाली. बदलत्या हवामानामुळे हिमाचल प्रदेशात लवकरच हिवाळी हंगामाची सुरुवात होईल. एकीकडे काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू झाली असतानाच मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे बिहार आणि छत्तीसगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीने बिहारमधील सर्व 38 जिह्यांमध्ये आणि छत्तीसगडमधील 28 जिह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बिहारमधील अनेक जिह्यांमध्ये शुक्रवारीही मुसळधार पाऊस पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर 2-3 फूट पाणी साचले होते. हवामान खात्याने मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाचे हे सत्र 6 ते 7 ऑक्टोबरपर्यंत कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.