प्रथम थप्पड खा, मग जेवण
अजब आहे हे रेस्टॉरंट, पैसे देऊन मार खातात लोक
जेव्हा आम्ही घरचे खाणे खाऊन कंटाळत असतो, तेव्हा बदल म्हणून रेस्टॉरंटला जातो, अशा स्थितीत काही न काही खास असलेल्या ठिकाणांची निवड केली जाते. जगभरात असे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, जी स्वत:च्या वैशिष्ट्यामुळे ओळखली जातात. परंतु एका रेस्टॉरंटमध्ये स्वागतादाखल येणाऱ्या ग्राहकांना थप्पड लगावली जाते. हे रेस्टॉरंट जपानमध्ये आहे. या ठिकाणच्या अजब संस्कृतीबद्दल कळल्यावर चकितच व्हायला होते.
या रेस्टॉरंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जपानी रेस्टॉरंटचे नाव शिचिहोकाया-या आहे. हे रेस्टॉरंट नागोया येथे असून तेथे वेट्रेस थप्पड लगावून ग्राहकांचे स्वागत करतात. येथे येणारे लोक 300 येन खर्च करून पारंपरिक जपानी पोशाखात असलेल्या वेट्रेसकडून थप्पड लगावून घेतात. या वेट्रेसने लगावलेली थप्पड तीव्रतेची असल्याने अनेकदा समोरचा माणूस खाली कोसळत असतो. थप्पडयुक्त संकल्पनेमुळे हे रेस्टॉरंट आता अत्यंत लोकप्रिय ठरले आहे.
जपानचे स्लॅप बार म्हणून देखील हे रेस्टॉरंट लोकप्रिय आहे. शिचिहोकोया-या हे रेस्टॉरंट 2012 मध्ये सुरू झाले होते. प्रथम हे रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर होते. परंतु नंतर येथे थप्पड लगावण्याची संकल्पना लागू करण्यात आली आहे. महिला वेट्रेस पोहोचताच लोकांना थप्पड लगावते, यामुळे लोकांची गर्दी हे दृश्य पाहण्यासाठी जमू लागली. थप्पड खाण्यासाठी लोक येथे रांगेत उभे असल्याचे दिसून येते.