शिवजयंतीनिमित्त पहिले शिवसाहित्य संमेलन होणार
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पत्रकार परिषदेत माहिती,
17 फेब्रुवारीपासून सुरू होणार संमेलन,
सर्व शिवप्रेमींनी भरभरून प्रतिसाद द्यावा
सातारा
सातारा शहरात शिवजयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समिती, सातारा यांच्यावतीने महाराष्ट्रातील पहिले शिवसाहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. हे संमेलन 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे व्याख्यानाचे आयोजन केले आहे. त्यासोबत पोवाडे सादर होणार आहेत. पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व शिवप्रेमी व सातारकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करत आहे. अशी माहिती सार्वजानिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अमोल मोहिते, अमित कुलकर्णी, विनोद कुलकर्णी, अॅड. नितिन शिंगटे, दत्ताजी थोरात, अतुल शालगर, जयंत देशपांडे, नंदकुमार सावंत, रविंद्र घाटपांडे व इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, या शिवसाहित्य संमेलनाला सोमवार 17 पासून सुरूवात होणार आहे. शाहूकला मंदिर येथे आयोजन केले आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. या दिवशी पहिल्या सत्रात छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार या विषयावर सौरभ कर्डे व्याख्यान देणार आहेत. थोरली मसलत या विषयावर शैलेश वरखडे व्याख्यान देणार आहेत.
दुसऱ्या सत्रात पियुषा भोसले व सहकलाकार शिवशाहिरांचे पोवाडे सादर करणार आहेत. तिसऱ्या सत्रात छत्रपतींची युद्धनिती या विषयावर मोहन शेटे व्याख्यान देणार आहेत. छत्रपती दुर्गवैभव या विषयावर प्रा. प्र. के. घाणेकर व्याख्यान देणार आहेत. सायंकाळी सांगता कार्यक्रमात अफजलखानाचा वध हे नाटक सागर मांडके व सारंग भोईरकर सादर करणार आहेत. यावेळी शाहूकला मंदिर परिसरात विविध प्रकाशकांचे स्टॉल उभारून इतिहासाच्या अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना ऐतिहासिक पुस्तके खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. 18 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास किल्ले अजिंक्यतारा येथे गडपुजन होणार आहे. सात वाजता मशाल महोत्सवाचे आयोजन केले आहे.
भव्य शोभायात्रेचे आयोजन
19 फेब्रुवारी शिवजयंती दिवशी सायंकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले आहे. या शोभायात्रेत केरळचे 100 कलाकार केरळी वाद्यांसह शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. या शोभायात्रेत गज नृत्य, ढोल ताशा पथक, तुतारी, हलगी वादन तसेच अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. उंट, घोडे, विविध चित्ररथ असणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व सातारकरांनी पारंपारिक वेशभुषेमध्ये हजर राहण्याचे आवाहन मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. रात्री 9 वाजता पोवईनाका येथील शिवतिर्थावर मंत्री छ. शिवेद्रराजे भोसले यांच्या हस्ते शिवरायांची महाआरती होणार आहे. यावेळेस डोळे दिपतील अशी सुंदर आतषबाजी होणार आहे.
राहूल सोलापूरकरवर कडक कारवाईची केली मागणी
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याच्या संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध करण्यात आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. महापुरूषाबद्दल कोणीही चुकीचा व तेढ निर्माण होईल असे बोलू नये, फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे बोलले जाते. यामुळे सर्वांनी भान ठेवून बोलण्याचे आवाहन त्यांनी केले.