भारतीय न्याय संहितेनुसार गोव्यात सुनावली पहिली शिक्षा
तरुणीच्या सतावणूकप्रकरणी तीन वर्षाचा कारावास
पणजी : गोव्यात नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेअंतर्गत पहिली शिक्षा फर्मावरण्यात आली आहे. हणजूण पोलिसांनी तरुणीचा पाठलाग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी सर्वेश गोवेकर याला म्हापसा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्षता काळे यांनी 3 वर्षांचा कारावास आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण 26 मे 2025 रोजी हडफडे, बार्देश येथील रहिवाशाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार होते. तक्रारदाराने नमूद केले होते की, आरोपी सर्वेश उर्फ ‘मुरु’ उर्फ ‘बाबू’ (राहणारा हडफडे येथे) हा दीर्घकाळापासून तरुणीचा पाठलाग करत होता. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, 24 मे 2025 रोजी दुपारी सुमारे 3.15 वाजता त्याने कोयता घेऊन तक्रारदाराच्या घराच्या व्हरांड्यात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यावेळी तक्रारदार घरात एकटीच होती. त्याने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तिला बेकायदेशीरपणे अडवून ठेवले आणि तिला मृत्यूची भीती निर्माण केली, असा आरोप आहे.
आरोपीने पुढे तिच्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि तिच्यावर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या. त्याने तक्रारदाराची आई आणि भावाला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. पूर्ण खटल्याच्या सुनावणीनंतर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्षता काळे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने आरोपीला ‘भारतीय न्याय संहिता’ अंतर्गत पुढील गुह्यांसाठी दोषी ठरवून शिक्षा सुनावली. यामध्ये भान्यासंचे कलम 78 नुसार 3 वर्षांचा साधा कारावास आणि 15,000 रुपयांचा दंड; कलम 79 नुसार 10,000 रुपयांचा दंड आणि कलम 333 अंतर्गत 1 वर्षाचा साधा कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाने पुढे असा निर्देश दिला की, आरोपीने जमा केलेली एकूण 35,000 रुपयांची दंडाची रक्कम, नुकसानभरपाई म्हणून पीडितेला देण्यात यावी. या खटल्याचे कामकाज सहाय्यक सरकारी वकील तेजस चोडणकर यांनी यशस्वीपणे चालवले, तर या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक साईश किनळेकर यांनी केला होता. हा निकाल नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये एक महत्त्वपूर्ण आदर्श प्रस्थापित करतो.