For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंडदरम्यान आज पहिला उपांत्य सामना

06:58 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडदरम्यान आज पहिला उपांत्य सामना
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे कर्णधार अनुक्रमे एडन मार्करम आणि मिचेल सँटनर हे टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत एक रोमांचक सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचे नेतृत्व आणि वैयक्तिक प्रतिभा त्यांच्या संघांच्या यशासाठी निर्णायक ठरेल.

आज बुधवारी येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषकातील पहिल्या उपांत्य फेरीत दोन प्रतिभावान कर्णधारांमध्ये एक रंजक लढाई पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे कर्णधार त्यांच्या संघातील सर्वांत जास्त कामगिरी करणारे खेळाडू असे चित्र फारसे आढळत नाही. या पार्श्वभूमीवर मार्करम विऊद्ध सँटनर ही अशी लढाई असेल ज्यामुळे ईडन गार्डन्सच्या जवळपास पूर्ण क्षमतेने भरणार असलेल्या स्टेडियमवर उपस्थित राहणाऱ्या लोकांची उत्सुकता ताणली जाईल.

Advertisement

2015 मध्ये झालेल्या 50 षटकांच्या सामन्यांच्या विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आयसीसीतील स्पर्धेतील वैर शिगेला पोहोचले होते. त्यावेळी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला एका रोमांचक सामन्यात पराभूत केले होते. त्यामुळे डेल स्टेन आणि ए. बी. डिव्हिलियर्स यांच्यासारख्या खेळाडूंना आयुष्यभरासाठी त्रास सहन करावा लागला होता. तथापि, शुक्री कॉनराडच्या मार्गदर्शनाखालील दक्षिण आफ्रिका आता एक धोकादायक संघ बनला आहे. गेल्या वर्षी त्यांनी पोलादी दृढनिश्चय दाखवत जागतिक कसोटी स्पर्धा जिंकली. त्यांनी आतापर्यंत एकही मोठा मर्यादित षटकांच्या सामन्यांचा चषक जिंकलेला नसला, तरी कुप्रसिद्ध चोकर्सचा टॅग आता त्यांच्या क्रिकेट शब्दकोशात नाही.

या लढाईच्या मुळाशी जे दोन कर्णधार आहेत ते बहुतेकदा सर्वाधिक प्रसिद्ध किंवा चर्चेत नसतात. परंतु रणनीती आणि तांत्रिकदृष्ट्या विचार करता त्यांचे महत्त्व भरपूर आहे. 175 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट असलेल्या आणि 268 धावा जमविलेल्या मार्करमचा पॉवरप्ले षटकांमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर खूप परिणाम झाला आहे, तर 6.35 च्या इकोनॉमी रेटसह सँटनरने फलंदाजांना बांधून ठेवले आहे. मार्करम, क्विंटन डी कॉक, डेवाल्ड ब्रेव्हिस, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर आणि मार्को जॅनसेन यांचा समावेश असलेली पॉवर-हिटर्सची फळी कोणत्याही संघाची झोप उडवू शकते.

परंतु सँटनरकडे रचिन रवींद्र (सातपेक्षा कमी इकोनॉमी रेटने 9 बळी), ग्लेन फिलिप्स, कोल मॅककॉन्ची असे अनेक कामचलावू फिरकी गोलंदाज आहेत, ज्यांनी एकत्रित कामगिरी केली आहे. जरी लियाम डॉसन आणि रेहान अहमदसह इंग्लंडकडेही चांगला फिरकी मारा असला, तरी भारताचा अपवाद सोडल्यास दक्षिण आफ्रिकेला सामना करावा लागणारा हा सर्वोत्तम फिरकी मारा आहे. न्यूझीलंडकडे दक्षिण आफ्रिकेला आव्हान देणाऱ्या एका दर्जेदार मनगटी फिरकी गोलंदाजाची कमतरता आहे. कारण ईश सोधीने आतापर्यंत खेळलेल्या काही सामन्यांमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.

ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडच्या संघाविऊद्ध लक्ष्याचा पाठलाग करण्यास इच्छुक असेल. न्यूझीलंडचे सुपर 8 टप्प्यातील सामने हे श्रीलंकेत संथ खेळपट्टीवर खेळले गेले होते. ईडनमधील फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी फिन अॅलन, टिम सेफर्ट, ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांना किमान 200 पेक्षा जास्त धावा काढाव्या लागतील. तरच त्यांना दक्षिण आफ्रिकेला आव्हान देण्याची संधी मिळेल. लुंगी एनगिडीचे कमी वेगाने टाकले जाणारे चेंडू या खेळपट्टीवर किती प्रभावी ठरतात आणि त्याचे वाइड यॉर्कर आणि कमी वेगवान लेगकटर न्यूझीलंडच्या फलंदाजांना आळा घालू शकतात हे पाहावे लागेल. न्यूझीलंडच्या बाजूने लॉकी फर्ग्युसनचा पहिला स्पेल सामन्याचे भवितव्य ठरवू शकतो.

संघ-न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन अॅलन, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, जेकब डफी, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, लॉकी फर्ग्युसन, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, कोल मॅककॉन्ची, जेम्स नीशम.

दक्षिण आफ्रिका : एडेन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रायन रिकल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जॉर्ज लिंडे, क्वेना माफाका, एनरिच नॉर्टजे, जेसन स्मिथ.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.

Advertisement
Tags :

.