Kolhapur News | आधी पुस्तक वाचा, मग बोला!"; आमदार संजय गायकवाडांच्या धमकीचा मेघा पानसरे यांच्याकडून तीव्र निषेध
गायकवाडांच्या धमकीवर मेघा पानसरे यांचा संताप
कोल्हापुर - शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड हे आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे... आता त्यांनी 'शिवाजी कोण होता' या प्रसिद्ध पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकाच्या शीर्षकावरून गायकवाड यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर आता दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांच्या सुनबाई आणि डॉ. मेघा पानसरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीचा डॉ. मेघा पानसरे यांनी तीव्र निषेध केला आहे. "आमदारांनी वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह असून, त्यांनी हे पुस्तक वाचले आहे असे वाटत नाही," अशा शब्दांत त्यांनी गायकवाडांना सुनावले.
मेघा पानसरे म्हणाल्या की, "छत्रपती शिवाजी महाराज हे जगभरात 'न्यायप्रिय राजा' म्हणून ओळखले जातात. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले हे पुस्तक ८० च्या दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले आहे. पानसरे यांनी मांडलेले विचार आजही जिवंत आहेत आणि विचारांना कधीही मारता येत नाही. गायकवाडांनी मांडलेल्या विधानाला कोणताही वैचारिक आधार नाही. माझे त्यांना आव्हान आहे की, त्यांनी आधी हे पुस्तक शांतपणे वाचावे, म्हणजे त्यांना कळेल की यात नेमके कोणते शिवाजी महाराज मांडले आहेत."