For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ayodhya Ram Mandir | राजीनाम्याच्या चर्चांवर गोविंद देव गिरी महाराजांचा स्पष्ट शब्दांत खुलासा म्हणाले...

04:01 PM Jul 14, 2026 IST | NEETA POTDAR
ayodhya ram mandir   राजीनाम्याच्या चर्चांवर गोविंद देव गिरी महाराजांचा स्पष्ट शब्दांत खुलासा म्हणाले
Advertisement

पुणे, : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित अपहारप्रकरणानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडत आपल्या राजीनाम्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. "मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. संकटाच्या वेळी रणांगण सोडून पळणे हा आमचा स्वभाव नाही. ट्रस्टवर आलेल्या या कठीण काळात खंबीरपणे उभे राहणे हेच माझे कर्तव्य आहे," असे ठाम प्रतिपादन त्यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केले.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराच्या दानपेटीतील कथित अपहारामुळे ट्रस्टवर विविध स्तरांतून टीका होत असताना महाराजांनी या घटनेला "अत्यंत लज्जास्पद आणि वेदनादायी" असे संबोधले. दानपेटीत अपहार झाल्याची बाब त्यांनी मान्य करत, या प्रकरणाची तांत्रिक बाजूही स्पष्ट केली.त्यांनी सांगितले की, मंदिरातील दानपेटीतील रक्कम मोजण्याचे काम सामंजस्य करारानुसार (MoU) स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (SBI) सोपविण्यात आले होते. सध्या या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी बँकेचे कर्मचारी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी बँकेची होती, असे त्यांनी नमूद केले.

मात्र, स्थानिक स्तरावर ट्रस्टच्या वतीने आवश्यक असलेले पर्यवेक्षण पुरेसे प्रभावी झाले नाही, याची कबुलीही त्यांनी दिली. विश्वस्त चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्याकडे या कामाची जबाबदारी होती. त्या पातळीवर काही प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचे मान्य करत, "ही केवळ एखाद्या व्यक्तीची चूक नसून ट्रस्ट म्हणून आम्ही सामूहिक जबाबदारी स्वीकारतो," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

राजीनाम्याच्या चर्चांवर पूर्णविराम देताना स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, "मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही. संकटाच्या काळात जबाबदारी टाळण्याऐवजी ती अधिक सक्षमपणे पार पाडणे, हेच माझे कर्तव्य आहे."या प्रकरणातील चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ट्रस्ट भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी देखरेख आणि सुरक्षा व्यवस्थेत आवश्यक ते बदल करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

Advertisement
Tags :

.