For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येतील पहिली रामनवमी

06:30 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येतील पहिली रामनवमी
Advertisement

25 लाख भाविक उपस्थित राहणार : 90 विमानोड्डाणे अन् 100 रेल्वेगाड्यांचे संचालन

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरच्या पहिल्या रामनवमीकरता सर्वात मोठे आयोजन  होणार आहे. 17 एप्रिल रोजी दुपारी 12.16 वाजता सूर्यकिरणांद्वारे रामलल्लाचा अभिषेक होणार आहे. हे अदभूत दृश्य पाहण्यासाठी आणि रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी सुमारे 25 लाख भाविक अयोध्येत पोहोचतील असा अंदाज आहे.

Advertisement

भाविकांची होणारी मोठी गर्दी पाहता प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. तीन दिवसांमध्ये अयोध्या विमानतळावर 90 फ्लाइट्स उतरणार आहेत. तर 100 रेल्वेगाड्या पोहोचणार आहेत. विविध मार्गांनी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेर्वरिता प्रशासनाने 500 बसेस सज्ज ठेवल्या आहेत. शहराला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 7 झोन आणि 39 सेक्टरमध्ये विभागण्यात आले आहे.

अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता 14 शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू झाली आहे. रामनवमीकरिता 3 दिवसांमध्ये अयोध्येत 50 फ्लाइट्स आणि 40 चार्टर्ड विमाने दाखल होणार आहेत. यात दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पाटणा, जयपूर, हैदराबाद येथून विमाने दाखल होतील. प्रवाशांकरिता विमानतळावर व्हीआयपी लाउंज अँड वेटिंग एरिया,  9 चेक-इन-काऊंटर आणि 3 कन्व्हेयर बेल्ट तयार करण्यात आले आहेत. 3 दिवसांमध्ये 4 हजारांहून अधिक भाविक विमानांद्वारे अयोध्येत पोहोचतील. रामनवमीकरिता विमान कंपन्यांनी फ्लाइटसच्या बुकिंगवर 2 हजार रुपयांपर्यंतची सूट देखील दिली आहे.

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उभारणीनंतर अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरदिनी सरासरी 1 लाखाहून अधिक भाविक रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. रामनवमीनिमित्त सर्वाधिक भाविक रेल्वेद्वारेच अयोध्येत दाखल होणार आहेत. याचमुळे रेल्वेने पुढील 3 दिवसांमध्ये 100 हून अधिक रेल्वेगाड्यांचे संचालन करण्याची व्यवस्था केली आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास 10 अतिरिक्त रेल्वेगाड्यांचे संचालन केले जाणार आहे. लखनौ, वाराणसी आणि प्रयागराजसाठी देखील विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत.

मोठा वाहनतळ

रामनवमीनिमित्त अयोध्येत 1 लाखाहून अधिक खासगी वाहने पोहोचण्याचे अनुमान आहे. याचमुळे प्रशासनाने एकाचवेळी 10 हजार वाहने पार्क करता येतील अशी व्यवस्था केली आहे. याकरिता विविध भागांमध्ये 35 पार्किंग स्थळ निर्माण करण्यात आले आहेत.

5 हजार छोटी-मोठी हॉटेल्स्

अयोध्येत पोहोचल्यावर भाविकांच्या वास्तव्यासाठी 5 हजाराहून अधिक हॉटेल्स्, धर्मशाळा आणि होम स्टे उपलब्ध आहेत. तेथील वास्तव्यभाडे 500 रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत आहे. याचबरोबर प्रशासनाने तंबू उभारत भाविकांसाठी मोफत वास्तव्यसुविधा देखील केली आहे. तसेच 100 हून अधिक मोठ्या मंदिरांमध्ये रामलल्लाच्या ट्रस्टच्या वतीने अन्नदान केले जात आहे. कुठलाही भाविक उपाशी राहू नये याकरिता ट्रस्ट खबरदारी घेत आहे.

सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त

अयोध्येत शरयू घाटापासून राम मंदिरापर्यंत 2 हजाराहून अधिक पोलीस आणि पीएसीचे जवान तैनात असतील. रामपथ, भक्तिपथ, जन्मभूमी पथावर बॅरियरच्या माध्यमातून गर्दीला नियंत्रित केले जाणार आहे. घाट परिसराला सुरक्षित करण्यासाठी जल पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफला तैनात करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.