आधी 3500 दर द्या, नंतर ऊसतोड करा
सांबरा रोडवर शेतकऱ्यांचे ऊसदरासाठी ठिय्या आंदोलन : राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र यातच ऊसदरासाठी आंदोलने तीव्र झाली आहेत. रविवारी दुपारी रयत शेतकरी संघटनेच्यावतीने तब्बल तासभर सांबरा रोडवर रस्तारोको करण्यात आला. महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातही उसाला प्रतिटन 3500 दर जाहीर करावा. त्यानंतरच ऊसतोड सुरू करावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. बराचवेळ रस्तारोको करण्यात आल्याने पोलिसांकडून शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.
राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहणे आवश्यक आहे. बेळगाव जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्यात सर्वाधिक उसाचे उत्पन्न बेळगाव जिल्ह्यात घेतले जाते. सरकारने एफआरपीची घोषणा करून ऊसदर निश्चित करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील राज्यकर्त्यांना इतर कामांसाठी वेळ असतो. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना वेळ नाही, ही मोठी शोकांतिका आहे. जिल्ह्यातील सर्व राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य करणे आवश्यक आहे. यासाठी कारखानदारांवर उसाला प्रतिटन 3500 रु. देण्यासाठी दबाव आणण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. आता सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणामही शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. कर्नाटकातील कारखानदारांकडून अद्याप ऊसदर जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहिल्यास राज्यातील कारखानदार आपल्या मनमानीप्रमाणे ऊसदर देतात. आता गळीत हंगामाला सुरुवात झाली असली तरी ते ऊसदर जाहीर न करताच ऊस गाळप करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पन्न घेतले जाते. बेळगाव जिल्हा हा सीमावर्ती भाग असल्याने राज्याची सीमा महाराष्ट्राला लागते. महाराष्ट्रातील कारखानदारांकडून योग्य ऊसदराची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा कल महाराष्ट्रात ऊस पाठविण्याकडे असतो. कारण कर्नाटकापेक्षा अधिक भाव महाराष्ट्रात मिळत असल्याने शेतकरी कर्नाटकाऐवजी महाराष्ट्रात ऊस पाठवितात. यामुळे महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातील कारखानदारांनी ऊसदर जाहीर करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांनी रस्तारोको केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तासाभरानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी ठिय्या मांडला होता. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत सुरू केली.
आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान रविवारी मुलांच्या विविध परीक्षा होत्या. वेळेवर पोहोचण्यासाठी मुले आपल्या पालकांसह इतर वाहनाने परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र आंदोलनाची कल्पना नसल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर जाणे मुश्कील बनले होते. मात्र पोलिसांनी याचे गांभीर्य ओळखून एका दिशेने वाहतूक खुली करून दिली होती. यामुळे मुलांना वेळेवर परीक्षा केंद्रावर जाता आले.