तीनशे अर्जांच्या नंतर पहिली नोकरी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय वंशाच्या ध्रूव लोया या एका इंजिनिअरला अमेरिकेच्या टेल्सा या प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली आहे. मात्र, ही नोकरी मिळविण्यसाठी त्याला 300 हून अधिक अर्ज करावे लागले आहेत. तसेच 500 हून अधिक ईमेल्स पाठवावे लागले आहेत. ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
लोया हा अत्यंत बुद्धीमान आणि कष्टाळू विद्यार्थी म्हणून त्याच्या महाविद्यालयीन जीवनात प्रसिद्ध होता. त्याचे शैक्षणिक करिअर अत्यंत उत्कृष्ट होते. तथापि, त्याला अमेरिकेत प्रवेश मिळविण्यासाठीही बरेच झगडावे लागले होते. अमेरिकेत काम करण्यासाठी लागणारा व्हिसा मिळविण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करावे लागले. शैक्षणिक कामगिरी उत्कृष्ट असूनही त्याला मनसारखी नोकरी मिळविण्याठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. यावरुन सध्या अमेरिकेतही नोकरी मिळविणे किती कठीण झाले आहे, याची प्रचीती येते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
निर्धार आणि संयमाचे कौतुक
कठीण परिस्थितीतही त्याने निर्धार न सोडल्याने आणि स्वत:च्या क्षमतेवरचा विश्वास ढळू न दिल्याने त्याला अखेर न्याय आणि यश मिळाले आहे. टेल्सामध्ये त्याला नोकरी हवी होती. त्याने 300 हून अधिक अर्ज केले तसेच सातत्याने कंपनीशी संपर्क ठेवला. त्याचा निर्धार पाहून त्याला ही नोकरी देण्यात आली आहे. त्याचा निर्धार इतरांना आदर्श ठरु शकतो, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.