For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तेजस’साठी अमेरिकेकडून पहिले इंजिन प्राप्त

06:11 AM Mar 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘तेजस’साठी अमेरिकेकडून पहिले इंजिन प्राप्त
Advertisement

‘जीई एरोस्पेस’कडून ‘एफ404-आयएन20’ इंजिन वितरित : तेजस लढाऊ विमानांच्या जलद निर्मितीचा मार्ग मोकळा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, वॉशिंग्टन

अनेक महिन्यांच्या विलंबानंतर अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेसने अखेर तेजस लढाऊ विमानाचे इंजिन भारताला सुपूर्द केले आहे. जीई एरोस्पेसने एक प्रेस रिलीज जारी करून याची पुष्टी केली आहे. हे इंजिन 99 इंजिनांच्या ऑर्डरपैकी पहिले असून ते तब्बल दोन वर्षांच्या विलंबानंतर वितरित करण्यात आले आहे. या श्रेणीतील इंजिननिर्मिती आता झपाट्याने होत असून आता टप्प्याटप्प्याने सदर इंजिन भारताला मिळत गेल्यानंतर नव्या-कोऱ्या तेजस लढाऊ विमानांच्या निर्मितीचा मार्ग सुकर होणार आहे.

Advertisement

2021 मध्ये एचएएलने तेजस एमके1ए एलसीए लढाऊ विमानांसाठी 99 इंजिन ऑर्डर केले होते. 2016 पर्यंत जीई एरोस्पेसने तेजस एलसीएसाठी 65 एफ404-आयएन20 इंजिन एचएएलला दिले होते. परंतु त्यानंतर, पुढील इंजिन ऑर्डर न मिळाल्याने, एफ404-आयएन20 इंजिनची उत्पादन लाइन बंद झाली. परंतु जेव्हा एचएएलने 2021 मध्ये पुन्हा तेजस एमके1ए एलसीएसाठी 99 इंजिन ऑर्डर केले, तेव्हा आमच्या टीमने ‘एफ404-आयएन20’ उत्पादन लाइन पुन्हा सुरू करण्याचे कठीण काम सुरू केले होते.

जीई एरोस्पेस आणि तेजस टीमने भारतीय हवाई दलाच्या गरजांनुसार ते डिझाइन करण्यासाठी अनेक वर्षांपासून एकत्र काम केले आहे. ‘एफ404’ने तेजस एलसीएसाठी परिपूर्ण असल्याचे दाखवून दिले आहे. 2008 मध्ये उ•ाण चाचण्यांदरम्यान, तेजस लढाऊ विमानाने या इंजिनसह मॅक 1.1 चा वेग गाठला होता. ‘एफ404-आयएन20’ इंजिन हे भारताच्या सिंगल-इंजिन लढाऊ विमानांसाठी एक कस्टमाइज्ड डिझाइन असून ज्यामध्ये एफ404 विभागातील सर्वात जास्त थ्रस्ट आणि हाय-फ्लो फॅन, अद्वितीय सिंगल-क्रिस्टल टर्बाइन ब्लेड आणि असंख्य विशेष घटक आहेत.

जीई एरोस्पेस कंपनीचे स्पष्टीकरण

‘आमच्या मौल्यवान ग्राहक हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट एमके1ए लढाऊ विमानासाठी ‘एफ404-आयएन20’ इंजिनपैकी पहिले इंजिन वितरित करताना आम्हाला खूप आनंद होत असल्याचे जीई एरोस्पेसने म्हटले आहे. एचएएलसोबतच्या आमच्या 40 वर्षांच्या संबंधात आणि देशाच्या संरक्षण उत्पादन क्षमता वाढवताना पुढील पिढीतील लढाऊ विमाने विकसित करून भारताच्या लष्कराचे मजबूत भविष्य सुनिश्चित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. भारतात लष्करी जेट प्रणोदन सहकार्याचा जीई एरोस्पेसचा एक मजबूत इतिहास आहे. 1980 च्या दशकात एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीसोबत सहयोग केल्यानंतर, 2004 मध्ये सिंगल-इंजिन तेजससाठी जीई एरोस्पेसचे ‘एफ404-आयएन20’ इंजिन निवडण्यात आले. हे भारत आणि जीई एरोस्पेस दोघांसाठीही एक महत्त्वपूर्ण यश होते.

विलंबाबाबत अलिकडेच भारताची नाराजी

तेजस लढाऊ विमानाचे इंजिन मिळण्यास झालेल्या विलंबामुळे भारताला खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. अलिकडेच भारतीय हवाई दल प्रमुख एपी सिंग यांनीही एचएएलबाबत नाराजी व्यक्त केली होती. भू-राजकीय परिस्थितीमुळे जीई एरोस्पेस भारताला इंजिनांचा पुरवठा करण्यास विलंब करत असल्याचे मानले जात होते. पुरवठा साखळीतील समस्यांमुळे इंजिन वितरणात विलंब होत होता.

Advertisement
Tags :

.