बेळगावमधून पहिली डेमू रेल्वे सुरू
हुबळी-मिरज मार्गाचा समावेश : जवळचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार
बेळगाव : दिवाळीनिमित्त बेळगावच्या प्रवाशांना रेल्वेने नवी भेट दिली आहे. गुरुवारपासून हुबळी-बेळगाव-मिरज या मार्गावर नवीन डेमू रेल्वे धावू लागली आहे. मुंबई येथील लोकल रेल्वेप्रमाणे डेमू रेल्वेमध्ये व्यवस्था असून जवळचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. जवळच्या हुबळी, वास्को, मिरज या जंक्शनवरून डेमू रेल्वे धावत होती. परंतु बेळगावच्या वाट्याला डेमू रेल्वे आली नव्हती. त्यामुळे रेग्युलर डबे पॅसेंजर रेल्वेला जोडले जात होते. गर्दीच्यावेळी या डब्यांमध्ये जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे डेमू रेल्वेची मागणी होत होती. सांबरा रेल्वेस्थानकात 8 दिवसांपूर्वी डेमू रेल्वे पार्किंगसाठी आणण्यात आली होती. त्यामुळे बेळगावकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गुरुवार दि. 16 पासून हुबळी ते मिरज या दरम्यान डेमू रेल्वे धावू लागली आहे. इतर रेल्वेपेक्षा डेमू रेल्वे थोडीशी वेगळी असल्यामुळे ती पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. याचप्रमाणे इतर पॅसेंजर रेल्वे डेमूमध्ये बदलण्याची मागणी प्रवाशीवर्गातून होत आहे.