शाळेचा पहिला दिवस जत पंचायतच्या दारात
जत :
राज्यभरात जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत करत होत असताना जत तालुक्यातील तांबेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिला दिवस पंचायत समितीच्या दारातच भरवला. शाळेला वर्ग खोली नसल्याने हा प्रकार घडला. आमच्या शाळेचे तत्काळ निर्लेखन करून नवीन इमारत द्या, अशी मागणी करत गटविकास अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन पालक, विद्यार्थी यांनी त्यांचे गांधीगिरी पद्धतीने स्वागत केले.
तांबेवाडी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संगीता सुरेश तांबे व सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली एका अनोख्या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले. यावर गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन 15 ऑगस्टपूर्वी निर्लेखनातील त्रुटी दूर करून इमारतीसाठी पाठपुरावा करू, असे लेखी आश्वासन दिले.
उपाध्यक्ष धनाजी कोडलकर, सदस्य सुरेश शामराव कोडलकर, सुरेश विठोबा कोडलकर, पांडुरंग चौगुले, गणेश तांबे, धनाजी तांबे, परमेश्वर कोडलकर, शाळेचे सर्व विद्यार्थी, समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जत तालुक्यातील तांबेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था दयनीय आहे. मुलांच्या जिवितास धोका निर्माण होईल, अशी ही इमारत मोडकळीस निघाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी शाळेच्या निर्लेखनाचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. मात्र, अद्याप यावर प्रशासनाने दाखल घेतलेली नाही. शिवाय, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संगीता तांबे व सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.
- प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष : सौ. तांबे
गेल्या अनेक वर्षांपासून तांबेवाडी येथील शाळेची इमारत जीर्ण झालेली असताना प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकीकडे प्रशासन मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यासाठी अनेक योजना राबवित आहे. मात्र, दुसरीकडे तांबेवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. प्रशासनाने तातडीने इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत द्यावी. अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संगीता सुरेश तांबे यांनी केली.