गुकेश मेंडोन्साला हरवून आघाडीवर, प्रज्ञानंदला पहिला धक्का
वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी (नेदरलँड्स)
नवव्या फेरीत विश्वविजेत्या डी. गुकेशने सहकारी लिओन ल्यूक मेंडोन्साच्या बचावाला भेदून विजय नोंदविल्याने त्याने टाटा स्टील मास्टरमध्ये एकट्याने आघाडी घेण्यात यश मिळविले. दुसरीकडे, या दिवशी आर. प्रज्ञानंदने डच ग्रँडमास्टर अनीश गिरीविऊद्ध पहिला सामना गमावला, तर अनुभवी पी. हरिकृष्णला रशियन-स्लोव्हेनियन व्लादिमीर फेडोसेव्हकडून पराभूत व्हावे लागले.
‘मी आज चांगला खेळ केला याचा मला आनंद आहे आणि अजून चार फेऱ्या शिल्लक आहेत. म्हणून मी स्थानाचा जास्त विचार करत नाही. मी कसा खेळत आहे त्याचा विचार करत असून त्याबद्दल मी आनंदित आहे’, असे गुकेशने त्याच्या सामन्यानंतर सांगितले.
या विजयासह गुकेशने त्याची गुणसंख्या उझबेक नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह आणि रशियन-स्लोव्हेनियन फेडोसेव्ह (प्रत्येकी 6 गुण) यांच्यापेक्षा जास्त केली असून ती 6.5 गुणांवर पोहोचविली आहे. प्रज्ञानंद 5.5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि या भारतीय खेळाडूसाठी पुढे परिस्थिती सुधारते की नाही हे पाहावे लागेल.
अन्य निकालात जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट (3.5 गुण) याने मॅक्स वार्मर्डम (3.5 गुण) याच्याशी बरोबरीत साधली तसेच वेई यी (5 गुण) व अर्जुन एरिगेसी (2.5 गुण) यांच्यातील सामनाही बरोबरीत सुटला. अॅलेक्सी सराना (5 गुण) व व्हिन्सेंट कीमर (3.5 गुण) आणि फॅबियानो काऊआना (5 गुण) व नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह (6 गुण) यांच्यातील सामनेही अनिर्णीत राहिले.