प्रथम वाद, मग भेट, आता थेट बढती
वृत्तसंस्था/पाटणा
बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांचे संजदमधील महत्त्व वाढले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना नवी जबाबदारी दिली आहे. अशोक चौधरी आता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव म्हणून नियुक्त झाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी अशोक चौधरी हे वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आले होते, परंतु वादानंतरही आता नितीश यांनी पक्षसंघटनेत महत्त्वाचे पद दिले आहे. अशोक चौधरी हे अलिकडेच पक्षनेतृत्वावर नाराज दिसून आले होते. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नाराजीचे संकेत दिले होते. यामुळे बिहारच्या सत्तारुढ पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचा संदेश गेला होता. अशोक चौधरी यांनी एका ट्विटमध्ये ‘वाढत्या वया’चा उल्लेख केला होता, ज्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना बोलावून घेत फटकारले होते.
नितीश यांच्या भेटीनंतर नरमाईची भूमिका घेतलेल्या चौधरी यांनी नितीश कुमार यांना मानस पिता संबोधित वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच मंत्री अशोक चौधरी यांनी 31 ऑगस्ट रोजी भूमिहारांवरून वादग्रस्त टिप्पणी केली होती. या टिप्पणीवरून पक्षाने स्वत:चे अंग झटकले होते. तसेच पक्षाने चौधरी यांना विचारपूर्वक टिप्पणी करण्याचा सल्ला दिला होता. अशोक चौधरी हे मूळचे काँग्रेसचे नेते आहेत. नितीश कुमार यांच्याशी सख्य असलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश केला जातो. याचमुळे नितीश कुमार यांनाच लक्ष्य करणारी सोशल मीडिया पोस्ट त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.