डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पहिली प्रशासकीय नियुक्ती
कर्मचारीवर्गाच्या प्रमुखपदी सुसी विलेस
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेच्या अध्यक्षपदी नुकतेच निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रथम प्रशासकीय नियुक्ती केली आहे. त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असणाऱ्या व्हाईट हाऊसच्या कर्मचारीवर्गाच्या प्रमुखपदी सुसी विलेस यांची नियुक्ती शुक्रवारी केली. अशाप्रकारे सुसी विलेस या हे पद भूषविणाऱ्या, अमेरिकेच्या इतिहासातील प्रथम महिला ठरणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ 20 जानेवारीला घेणार आहेत.
व्हाईट हाऊसच्या कर्मचारीवर्गाचे प्रमुखपद हे अमेरिकेच्या प्रशासनातील महत्त्वाचे पद मानले जाते. व्हाईट हाऊस हे केवळ अध्यक्षांचे निवासस्थान नसून अमेरिकेचे प्रशासन चालविण्याचे सर्वोच्च केंद्र असते. त्यामुळे व्हाईट हाऊसची सूत्रे घेणारी व्यक्ती ही प्रशासकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
निकटच्या सहकारी
विलेस या ट्रम्प यांच्या अत्यंत निकटच्या सहकारी आहेत. त्यांचे कार्य केवळ कार्यालयीन नसून त्या ट्रम्प यांची मानसिकता सांभाळण्याचेही कार्य करतात, अशी माहिती त्यांच्यासंदर्भात उपलब्ध झाली आहे. ट्रम्प यांचा मूड अत्यंत खराब स्थितीत असतानाही त्या त्यांना टोमणेबाजी न करता किंवा उपदेश न करता शांतपणे परिस्थिती हाताळतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या मनातही त्यांच्यासंबंधी आदराची आणि सन्मानाची भावना आहे, अशी अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्या बुद्धिमान आणि कल्पक असून आपले उत्तरदायित्व सांभाळण्यास सर्वथैव सक्षम आहेत, असे स्वत: ट्रम्प यांनीच त्यांची नियुक्ती करताना स्पष्ट केले आहे.
पद किती महत्त्वाचे...
व्हाईट हाऊसच्या कर्मचारीवर्गाचे प्रमुखपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील पद आहे. अध्यक्षांच्या निवासास्थानाचे कार्य प्रभावीपणे चालण्यासाठी या पदावरील व्यक्ती तितकीच प्रभावशाली पण मृदू स्वभावाची असणे आवश्यक असते. सुसी विलेस यांच्यात हे सर्व गुण आहेत, असे अमेरिकेतील राजकीय तज्ञांचे मत आहे.