जमिनीच्या वादातून क्षेत्रमाहुलीत हवेत गोळीबार
सातारा :
सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीत जमिनीच्या कारणावरुन जाधव आणि देशमुख यांच्यात वाद सुरु आहेत. त्यातच देशमुख यांनी वहिवाट करण्यासाठी जेसीबी नेल्याचे समजताच जाधव यांनी जावून त्यांना अटकाव केला. अगोदर शाब्दीक वादावादी झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसन धक्काबुक्कीत झाले. हे पाहून विजयराव जाधव यांनी कमरेचे पिस्टल काढून हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेची माहिती लगेच सातारा शहर पोलिसांना मिळताच शहर पोलिसांचे पथक ऑन दि स्पॉट पोहोचले म्हणून पुढचा वाद टळला. दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधात फिर्याद नोंदवून घेण्याचे काम सुरु आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथील विजय सर्जेराव जाधव आणि भरत हरिभाऊ देशमुख यांच्यात जागेवरुन वाद आहे. त्याच जमिनीत वहिवाट करण्यासाठी बुधवारी भरत देशमुख यांच्यासह रवी देशमुख व इतर कुटुंबिय जेसीबी घेवून गेले. दुपारी ते शेतात पोहोचले. याची माहिती विजय जाधव यांना मिळताच जाधवही तेथे पोहोचले. त्यांनी त्या शेतातून जेसीबी चालकास बाहेर काढले. त्यावरुन जाधव आणि देशमुख यांच्यामध्ये अगोदर शाब्दीक चकमक उडाली. शब्दाने शब्द वाढत जावून देशमुख आणि जाधव यांच्यामध्ये झटापट झाली. त्यामध्ये जाधव यांनी सोबत नेलेला रिव्हॉल्वर बाहेर काढून हवेत गोळीबार केला. हवेत गोळीबार झाल्याने तसेच झालेल्या झटापटीत दोन जण जखमी झाले. याची माहिती तेथील रवी देशमुख यांनी पोलीस पाटील खंडाईत यांना दिली. खंडाईत यांनी लगेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना दिली. म्हस्के यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मोरे, डीबीचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी झालेल्या दोघांना तत्काळ रुग्णालयात नेले. तसेच हवेत फायरिंग केलेले पिस्टल जप्त केले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान, दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी फिर्यादी देण्याचे काम सुरु होते. पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.