तवंदी घाटात गोळीबार : एक बचावला
तवंदी :
तवंदी घाटात एकाने गोळीबार केला परंतु दुसरा खाली वाकून बसल्यामुळे थोडक्यात तो बचावला. ही घटना तवंदी घाटात हॉटेल व्हाईट हाऊस नजीक शनिवारी दुपारी घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, तवंदी घाट हॉटेल व्हाईट हाऊस नजीक अचानक दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून शाब्दिक चकमक झाली. याचा राग मनात धरून एकाने अचानक दुसल्यावर गोळीबार केला, परंतु ती व्यक्ती खाली बसल्याने थोडक्यात बचावली. सदर गोळीबार घटनेतील व्यक्ती इचलकरंजी व सांगली भागातील असल्याचे समजते. या घटनेबाबत त्वरित निपाणी शहर पोलीस ठाण्याला कल्पना दिल्यानंतर निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेसंदर्भात अधिक चौकशी चालू असून अद्याप पूर्ण तपशील मिळाला नाही. सदर घटना अचानक घडल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचा अधिक तपास निपाणीचे सीपीआय बी. एस. तळवार करीत आहेत.