गोकाक महालक्ष्मी यात्रेत गोळीबार
रमेश जारकीहोळी पुत्रावर एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
गोकाक येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. शनिवारी भंडाऱ्याची उधळण सुरू असतानाच माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या चिरंजीवाने बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात्रेकरू व पोलिसांसमक्ष झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.
रमेश जारकीहोळी यांचे चिरंजीव संतोष यांनी बंदुकीतून हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला आहे. या पार्श्वभूमीवर गोकाक शहर पोलिसांनी सरकारतर्फे शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली आहे.
हवेत गोळीबार करताना इतर यात्रेकरू महालक्ष्मीचा जयजयकार करीत होते. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या शस्त्रास्त्रांचा वापर करणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन ठरते. यात्रेच्यावेळी गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने पोलिसांनी स्वत:हून एफआयआर दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे.