दिल्लीत ‘वेलकम’मध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू
तीन अल्पवयीन मुलांना अटक, आर्थिक व्यवहारातून हत्येचा प्रकार घडल्याची माहिती समोर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील वेलकम परिसरात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना घडल्यानंतर हल्लेखोर मोटारसायकल सोडून पळून गेले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हल्लेखोरांना शोधण्यासाठी तपास पथके नियुक्त करण्यात आली. त्यानंतर वेलकम परिसरात हत्या आणि ज्योती नगरमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्याने संबंधित भागात भीतीचे वातावरण आहे. आता वेलकम परिसरात झालेल्या हल्ल्यात नदीम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर शाहनवाज नावाचा दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे. त्याचवेळी दुसऱ्या घटनेत ज्योतीनगर परिसरात असलेल्या न्यू कर्दमपुरी येथील गल्ली क्रमांक 5 मध्ये याच अल्पवयीन हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळावरून 7 रिकामी काडतुसे आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी तीनही अल्पवयीन हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. गोळीबारानंतर आरोपींनी मयताचा मोबाईल आणि स्कूटर घेऊन पळ काढला होता, अशी माहिती दिल्ली ईशान्यचे डीसीपी राकेश पावरिया यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.
वेलकम हल्ल्यात जीव गमावलेल्या नदीमचा जीन्सचा कारखाना असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन आरोपींपैकी एकाने नदीमकडून व्याजावर 10 हजार ऊपये घेतले होते. नदीम हा आरोपींवर व्याज देण्यासाठी दबाव टाकत होता. यामुळे तिघांनी नदीमची हत्या केली. नदीमचा खून केल्यानंतर आरोपींनी त्यांची दुचाकी सोडून मृताची स्कूटी व मोबाईल घेऊन पळ काढला. ज्योती नगरमध्ये घडलेल्या घटनेबाबत बोलताना पोलिसांना गोळीबाराचा पीसीआर कॉल आला होता. परिसरातील न्यू कर्दमपुरी येथील रहिवासी असलेल्या प्रमोदने गल्ली क्रमांक 5 मध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.