अग्निशमन जवानांमुळे 16 कोटींच्या मालमत्तेचे संरक्षण
बेळगावमध्ये वर्षभरात 198 आगीच्या घटना : 2024 मधील कामगिरी कौतुकास्पद
बेळगाव : आग लागल्यानंतर पहिल्यांदा आठवण होते ती अग्निशमन जवानांची. 2024 मध्ये बेळगाव तालुक्यात एकूण 198 आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये 17 कोटी 82 लाख रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले. तर अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे 16 कोटी 22 लाख रुपयांची संपत्ती नुकसान होण्यापासून वाचली. त्यामुळे अग्निशमन जवानांची 2024 मधील कामगिरी कौतुकास्पद ठरली. शहराचा विस्तार वाढत असल्याने विविध कारणांनी आग लागल्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील वर्षभरात लहान 195, मध्यम 2 तर मोठ्या आगीची घटना एक घडली आहे.
यामध्ये एका व्यक्तीचा आगीमुळे मृत्यू झाला. तर दोन जनावरे दगावली आहेत. धोक्याच्या परिस्थितीतही जवानांनी जीवाची बाजी लावत मालमत्ता वाचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. एखादी आग लागण्याची मोठी घटना घडल्यानंतर केवळ बेळगाव येथील अग्निशमन बंबांवर अवलंबून चालत नाही. नावगे क्रॉस येथील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याला भीषण आग लागली होती. संपूर्ण कारखानाच जळत असल्याने बेळगावसोबत खानापूर, बैलहोंगल, हुबळी, धारवाड, येथूनही अग्निशमन बंब मागविण्यात आला होता. आग आटोक्यात आणण्यास दोन दिवस प्रयत्न करावे लागले. त्यामुळे बाहेरील अग्निशमन पथकाला पाचारण करावे लागते.
उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या आगीच्या घटना
आग लागण्याच्या घटनांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढ होते. मागील वर्षाचा विचार करता जानेवारी ते मे दरम्यान आग लागण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. जानेवारीमध्ये 23, फेब्रुवारीमध्ये 40, मार्चमध्ये 49, एप्रिलमध्ये 24, तर मे मध्ये 22 घटनांची नोंद अग्निशमन विभागाकडे आहे. संपूर्ण वर्षभरात 17 कोटी 82 लाख 81 हजार 151 रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे.
आग लागल्यास कुठे संपर्क कराल?
अग्निशमन विभागाने तीन हेल्पलाईन सुरू केल्या असून त्याठिकाणी तात्काळ संपर्क साधल्यास जवान वेळेत घटनास्थळी हजर होऊ शकतात. 0831-2429441, किंवा 101 अथवा 112 या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास अग्निशमनचे जवान तसेच बंब वेळेत पोहोचणे शक्य होऊ शकते.
परिसरातील शाळांमध्ये जागृती
आगीच्या घटननेनंतर तात्काळ नागरिकांनी अग्निशमन विभागाला संपर्क साधणे गरजेचे आहे. कमीतकमी हानी होईल यासाठी जवान प्रयत्नशील असतात. सर्वप्रथम कुणाचाही जीव जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते. बेळगाव परिसरातील शाळांमध्ये जागृतीसाठी अग्नी सुरक्षा प्रशिक्षण शिबिर घेतले जात आहे.
- शिवाजी कोरवी (तालुका अग्निशमन अधिकारी)