दिल्लीत फटाक्यांवरही यंदाही बंदी
पर्यावरणमंत्री गोपाळ राय यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केजरीवाल सरकारने मागील वर्षाप्रमाणेच यंदाही निर्णय घेतला आहे. सरकारने फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. फटाक्यांची ऑनलाइन विक्री-डिलिव्हरीवरही बंदी असणार आहे. ही बंदी 1 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे. बंदी कठोरपणे लागू करण्यासाठी दिल्ली पोलीस आणि महसूल विभागासोबत मिळून कार्ययोजना तयार केली जाणार असल्याचे दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाळ राय यांनी सोमवारी सांगितले आहे.
ऑक्टोबरपासून दिल्लीची हवेची गुणवत्ता खालावू लागते. त्या काळात तापमान कमी होऊ लागताच वाऱ्याच्या वेगावरही प्रभाव पडतो. तर त्याच सुमारास दिल्लीच्या आसपासच्या भागांमध्ये शेतकरी शेतातील काडीकचरा जाळण्यास सुरुवात करत असतो. यामुळे दिल्लीतील प्रदूषण वाढत असते. तसेच दिवाळीच्या वेळी फटाके फोडण्यात आल्यास हवेची गुणवत्ता आणखीच खालावते. तर दुसरीकडे दिल्लीतील अनेक भाग हे फटाक्यांच्या व्यवसायाची मुख्य केंद्रं आहेत. परंतु फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्याने लोकांच्या रोजगारावरही प्रतिकूल प्रभाव पडला आहे.