भ्रष्ट सीडीपीओची हकालपट्टी करा
अंगणवाडी वर्कर्स अन् हेल्पर्स फेडरेशनच्या बैठकीत मागणी : उद्या मोर्चा काढण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर सीडीपीओचा भ्रष्टाचार वाढला आहे. याचा अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना त्रास होऊ लागला आहे. संबंधित सीडीपीओची चौकशी करून त्याची हकालपट्टी करावी, अशी मागणी शनिवारी झालेल्या अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स फेडरेशनच्या बैठकीत करण्यात आली आहे. यासाठी सोमवार दि. 30 रोजी शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्यावर मोर्चा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.
बालक आणि गर्भवतींना पौष्टिक आहार म्हणून अंडी दिली जातात. या अंड्यांसाठी शासनाकडून येणारे अनुदानही संबंधित सीडीपीओ गिळंकृत करत आहे. बालविकास समितीला धमकावून शासनाच्या अनुदानामध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. शिवाय भाडोत्री अंगणवाडीचे पैसे जमा करायचे असल्यास 15 टक्के कमिशनची मागणी या सीडीपीओकडून होऊ लागली आहे. तातडीने या सीडीपीओची हकालपट्टी व्हावी, असा रोष देखील बैठकीत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी व्यक्त केला आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांचे दुर्लक्ष
महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे सदर सीडीपीओची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या सीडीपीओचे फावले आहे. भ्रष्टाचारामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि बालकांचेही नुकसान होऊ लागले आहे.
बैठकीला अॅड. नागेश सातेरी, यल्लुबाई शिगेनहळ्ळी, गीता भोसले यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस बहुसंख्येने उपस्थित होत्या.