अग्नि, सूर्य, चंद्र, तारे, विद्वान् ब्राह्मण यांचे तेज बाप्पांचे आहे
अध्याय नववा
त्रिगुणांच्या पलीकडे जाणे म्हणजे माया नदी पार करणे हे माणसाच्या कुवतीच्या बाहेरचं आहे पण जे ईश्वराची कास धरतील तेच फक्त या संसार सागरातून पोहून पलीकडे जाऊ शकतील असं भगवंतांनी गीतेत वचन दिलं आहे. आपण सध्या अभ्यासत असलेल्या श्लोकात बाप्पा सांगतात की, एकनिष्ठेने माझी भक्ती कर त्यामागे आपल्या भक्ताचे भले व्हावे हेच कारण आहे. तो श्लोक असा, ततश्च सर्वभावेन भज त्वं मां नरेश्वर । भक्त्या चाव्यभिचारिण्या सर्वत्रैव च संस्थितम् ।। 35 ।। संतानी हे बरोबर ओळखलेले असते. त्यामुळे सध्याच्या जीवनात होणारा त्रास हा आपल्या पूर्वप्रारब्धाचे म्हणजे मागील जन्मात आपण केलेल्या कृत्याचे फलित आहे हे लक्षात घेऊन तो ते निमुटपणे सोसतात. देहाला होणाऱ्या त्रासाची फिकीर न करता ते ईश्वर भक्तीत तल्लीन होतात. आपण म्हणजे हा देह नव्हे हे लक्षात घेऊन त्यांनी देह प्रारब्धावर सोडलेला असल्याने त्यांना त्रास देणाऱ्याबद्दल त्यांच्या मनात कोणताही आकस नसतो. श्रीसंत गजानन महाराजांनी त्यांना उसाने मारणाऱ्या पाटील बंधूंवर न रागावता त्याच ऊसाचा रस काढून त्यांना अत्यंत प्रेमाने प्यायला दिला. असं करणं, हे केवळ देह प्रारब्धावर टाकल्यानेच शक्य होतं. मनुष्य जेव्हा देह प्रारब्धावर टाकतो तेव्हा त्याला ज्याप्रमाणे अर्जुनाला केवळ पोपटाचा डोळा दिसत होता, त्याप्रमाणे इतर सर्व गोष्टींचा विसर पडून केवळ सर्वांच्यात वसत असलेला ईश्वर दिसत असतो व ते त्याची अनन्य म्हणजे अन्य कुणी नाहीच याची खात्री पटून भक्ती करत असतो.
बाप्पा म्हणाले, अशा अनन्य भक्ताला आत्मसाक्षात्काराचाच अनुभव आला असल्याकारणामुळे तो देहातच विदेहीपणे वागत असतो. अशा भक्ताने मुक्ति नको म्हंटलं तरी ती त्याच्या पाठीस लागते आणि माझ्यावरील विश्वासानेच माझ्या स्वरूपाची भेट होते. माझ्या स्वरूपाला पोचून जे देहाभिमानाला विसरतात, ते ज्ञानमय होऊन माझ्या आनंदरूप रसामध्ये निमग्न होतात. आपल्याला कधी देहभावना होती हे ते विसरतात. मग मी आणि तू ही आठवण कशी राहणार? अंत:करणाचेच विस्मरण झाल्यामुळे तो स्वत:च स्वत:ला विसरून गेलेला असतो. त्यामुळे त्याच्या लेखी मी सोडून इतर गोष्टी अस्तित्वातच नसतात मग स्वर्ग- नरक, चांगले-वाईट कशाचे? चौदा लोक तरी कशाचे? सर्वत्र एकटे एकच ब्रह्मस्वरूप शिल्लक राहते. पवित्र आणि अपवित्र, तिर्थक्षेत्र, वेदशास्त्र कशाकशाचे महत्त्व रहात नाही. उत्पत्ती आणि विनाश, वैकुंठ आणि कैलास, ब्रह्मा, विष्णु आणि महेश सगळे सगळे नाहीसे होऊन एक अविनाशी ब्रह्मच काय ते शिल्लक राहते. तेथे कसला बोध आणि कसली बुद्धि! तेथे खरोखर देवपणसुद्धा नाहीसे होते. मोक्षसिद्धीसुद्धा लाजेने नाश पावतात. मग क्षीरसमुद्रातील शेषशायी तरी कुठून येणार? तेथे माझे बाप्पा हे सगुण रूपसुद्धा नाहीसा होते. इतके सायुज्यस्वरूप त्यांना प्राप्त होते. पुढे बाप्पा सांगतात माझीच अनन्य भक्ती का करायची तर सर्व चराचर मीच व्यापून राहिलेलो आहे. कसे ते पुढील श्लोकातून सविस्तर सांगतो.
अग्नौ सूर्ये तथा सोमे यच्च तारासु संस्थितम् ।
विदुषि ब्राह्मणे तेजो विद्धि तन्मामकं नृप ।। 36 ।।
अर्थ-हे नृपा, अग्नि, सूर्य, चंद्र, तारे, विद्वान् ब्राह्मण यांचे ठिकाण जे तेज असते ते माझे आहे.
विवरण-समस्त चराचर सृष्टीची निर्मिती ईश्वरानेच केलेली आहे व ती सर्वांना दिसावी यासाठी जो प्रकाश आवश्यक आहे तोही त्याच्यापासूनच आलेला आहे अग्नी, सूर्य, चंद्र, तारका व विद्वान ब्राह्मण यांना प्राप्त झालेल्या तेजावरून ईश्वराचे तेज किती दैदिप्यमान असेल याची आपण कल्पना करू शकतो.
क्रमश: