नाटे बाजारपेठेत अग्नितांडव
राजापूर :
तालुक्यातील नाटे बाजारपेठ येथे एका इमारतीत लागलेल्या भीषण आगीत इमारतीमधील सात दुकान गाळे व त्यामधील सर्व साहित्य खाक झाले. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग शनिवारी मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

नाटे बाजारपेठ येथे धाऊलवल्ली येथील राजेश पावसकर यांच्या मालकीची इमारत असून या इमारतीमध्ये दिगंबर गिजम यांचे उपाहारगृह, भीम खंडी चायनीज सेंटर, प्रदीप सहदेव मयेकर यांचे टेलरिंग शॉप, केदार मधुकर ठाकुर यांचे कापड आणि प्लास्टिक दुकान, प्रसाद सदाशिव पाखरे यांचा फोटो स्टुडिओ, निकिता नारायण गोसावी यांचे ब्युटी पार्लर, नारायण गोसावी यांचे कटलरी साहित्याचे गोदाम होते. मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीला आग लागली. ही आग काही तासात भडकल्याने हे सर्व गाळे व त्यामधील साहित्य खाक झाले आहे. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
- स्थानिक ग्रामस्थांनी केली शर्थ
आग मध्यरात्रीच्या वेळी लागल्याने आग विझविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक, अंमलदार व पोलीस ठाण्यातील उपलब्ध अंमलदार लागलीच घटनास्थळी हजर झाले. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी खासगी गाड्यांनी पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राजापूर नगर परिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी आल्यानंतर लागलेली आग पहाटे चार वाजता आटोक्यात आली.
- पोलिसांकडून चौकशी सुरू
या आगीची माहिती मिळताच नाटे गावातील अनेक युवक तत्काळ घटनास्थळी धावले. साखरी-नाटे येथील मुस्लिम युवकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. आम्ही कोणाचे दुकान, कोणाचा धर्म हे न पाहता फक्त माणूस म्हणून रात्रभर पाणी आणत राहिलो, असे मजीद गोवळकर यांनी सांगितले. तर ‘हे फक्त दुकान नव्हते, आमचं जग होतं’, असे भावूक उद्गार एका व्यापाऱ्याने अश्रूंनी भरलेले डोळे पुसताना काढले. स्थानिक प्रशासन, पोलीस व नगर परिषदेच्या समन्वयाने पुढील चौकशी सुरू आहे. माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी भेट देत पाहणी केली व व्यापाऱ्यांची भेट घेतली. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, विभाग प्रमुख मनोज आडविरकर व पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनीही जळलेल्या दुकानांची पाहणी करून व्यापाऱ्यांची भेट घेतली.