श्रीपेवाडी संकपाळ हायस्कूलमध्ये आग
वार्ताहर/ निपाणी
श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूल इमारतीमध्ये शॉर्टसर्किटने आगीची दुर्घटना घडल्याची घटना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. यामध्ये संगणक रुममधील सर्व 30 संगणकांसह संगणकपूरक साहित्य, बॅटऱ्या व फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
संगणक रुमच्या शेजारी असणाऱ्या मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय कार्यालयालाही आग लागली. यामध्ये देखील फर्निचर व काही कागदपत्रे आगीत जळाली. ही आग विझवण्यासाठी निपाणी अग्निशमन दल व हालशुगर अग्निशमन दलाने सुमारे दोन तास कसोशीने प्रयत्न केले. उपस्थित माजी विद्यार्थी वर्गाने देखील आग विझवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संगणक, फर्निचर आणि इतर साहित्य असे मिळून एकूण 40 लाखाचे नुकसान झाले असल्याचे हायस्कूल प्रशासनाने सांगितले.
सहामाही परीक्षा संपल्याने हायस्कूल व प्राथमिक शाळेला दसरा उत्सवाची सुटी देण्यात आली आहे. दहावीचे अधिकचे वर्ग मात्र शनिवारी भरण्यात आले होते. सकाळच्या टप्प्यात 11 पर्यंत हे वर्ग भरवले होते. हे सर्व विद्यार्थी देखील आपापल्या घरी परतले. यानंतर 12 वाजण्याच्या अगोदर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी देखील हायस्कूल बंद करून निघून गेले. पण याचवेळी काही मिनिटांनी हायस्कूलमधून धूर बाहेर पडू लागल्याचे श्रीपेवाडी येथील ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थ व युवकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी धाव घेऊन काय झाले आहे याचा अंदाज घेतला. यामध्ये संगणक रुमला आग लागल्याचे लक्षात आले. यानंतर तातडीने अग्निशमन बंबांना पाचारण करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. शॉर्टसर्किटने लागलेली आग आणि त्यातच रुममध्ये असणारे सर्व इलेक्ट्रिक साहित्य व बॅटरी यामुळे आगीने थोड्याच वेळात रौद्ररूप धारण केले. त्यातच या रुममध्ये सर्व अॅल्युमिनियम व काचेच्या केबिन होत्या. यामुळे आगीचा फैलाव होऊ शकला नाही. पण ज्यावेळी अग्निशमन दलाने दरवाजे उघडले. त्यावेळी सर्व केबिनमधील काचा फुटून मोठा आवाज झाला आणि आग अधिक फैलावली. बाजूच्या मुख्याध्यापक कार्यालयात देखील आगीने शिरकाव केला. अग्निशमन दलासह उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. घटनास्थळी शाळेचे व्यवस्थापकीय मंडळ, संचालक, सर्व आजी-माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ आजी-माजी विद्यार्थी यांनी गर्दी केली होती.