For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Crime News: शिये फाटा येथे हवेत गोळीबार, किरकोळ वादातून मित्रावर रोखली रिव्हॉल्व्हर

04:53 PM Aug 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
crime news  शिये फाटा येथे हवेत गोळीबार  किरकोळ वादातून मित्रावर रोखली रिव्हॉल्व्हर
Advertisement

सलग तीनवेळा फायरिंग झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली

Advertisement

पुलाची शिरोली : शिये फाटा (ता. करवीर) येथे मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकावर रिव्हॉल्व्हर रोखण्यात आली. प्रसंगावधान राखून एकाने हात वर उचलल्याने हवेत गोळीबार झाला. यामुळे अनर्थ टळला. सलग तीनवेळा फायरिंग झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

या घटनेनंतर संशयित शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला. गणेश अर्जुन शेलार (वय 42, रा. संभापूर, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. शिये फाटा, टोप हद्दीत फेडरल बँकेसमोर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.

Advertisement

याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गणेश शेलार, नितीन पाटील (रा. नागाव) व विजय धोंडीराम पोवार (रा. टोप) हे तिघे मित्र आहेत. एका महिलेशी असणाऱ्या संबंधावरून या तिघांमध्ये गैरसमज निर्माण झाले होते. शनिवारी सायंकाळी गणेश शेलार हा साडेसहाच्या सुमारास पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत शिये फाट्यानजीक फेडरल बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता.

याची माहिती नितीन पाटील व विजय पोवार यांना मिळाली. त्यामुळे 20 ते 25 जण घेऊन नितीन व विजय बॅंकेसमोर आले. गणेश एटीएममधून बाहेर येताच त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी गणेश याने विजयवर रिव्हॉल्व्हर रोखले.

तो गोळीबार करणार इतक्यात त्याच्या मागे असणाऱ्या तरुणांनी गणेशचा हात वर उचलला. यामुळे लागोपाठ तीनवेळा हवेत गोळीबार झाला. गोळीबारामुळे जमाव पांगला आणि गणेश आपली मोटारसायकल घेऊन पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर त्याने याबाबतची माहिती पोलिसांना सांगितली.

दरम्यान, विजय पोवार याचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठण्यासमोर हजर झाले. पोलिसांनी जमावाला पांगवले. रात्री आठ वाजता अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू व करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी गणेश शेलार याच्याकडून घटनेची माहिती घेतली.

हा वाद एका नाजूक प्रकरणातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड यांनी संशयित आरोपी गणेश शेलार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल व रिकामे काडतूस जप्त केले. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Advertisement
Tags :

.