For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दारू वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग

01:23 PM Jun 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
दारू वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग
Advertisement

धारगळ महाखाजन राष्ट्रीय महामार्गावरील घटना, कंटेनरचा दर्शनी भाग जळून खाक,चालक फरार, तपास सुरू

Advertisement

पेडणे : म्हापसामार्गे बेकायदा दारू घेऊन येणाऱ्या कंटेनरच्या कॅबिनला धारगळ महाखाजनजवळ महामार्गावर अचानक आग लागली. आग लागल्यानंतर वाहन चालकाने तेथून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पेडणे, म्हापसा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. केबिनमध्ये असलेली कागदपत्रे जळून खाक झाल्यामुळे दारू कुठून आणली आणि कुठे नेण्यात येत होती याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. पेडणे अग्निशामक दलाने हे वाहन पोलिसांच्या हवाली केल्यानंतर वाहतूक खात्याचे अधिकारी घटनास्थळी आले. अबकारी खात्याचे अधिकारी घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा केला. या कंटेनरमध्ये किती किमतीची दारू होती याचा हिशेब अजून मिळालेला नाही. अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजता धारगळ महाखाजन येथे मोठ्या कंटेरनरला आग लागण्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. लगेच दलाचे साहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर, हवालदार प्रदीप आसोलकर, चालक आल्वारीस मास्कारेन्हस, जवान केतन कामुलकर, शुभम कामत, तेजस अरोंदेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. कंटेनरचा मागचा दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये दारूचे खोके भरलेले सापडले. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस व अबकारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पेडणे पोलिसांनी वाहनासह दारू ताब्यात घेतली. या वाहनात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची दारू होती. ती अबकारी कार्यालय पेडणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली. आग लागल्यानंतर सदर वाहनाचा चालक अपघातस्थळी सापडला नसल्याने तो पळून गेला असणार अशी शक्यता आहे. ही दारू नेमकी गुजरातमध्ये नेण्यात येत होती की अन्य कुठे त्याचा तपास सुरू असल्याचे लोकरे यांनी सांगितले. 

Advertisement

Advertisement
Tags :

.