दिल्लीत इमारतीच्या 7 व्या मजल्यावर आग, 3 ठार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या द्वारका सेक्टरमधील शब्द अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये मंगळवारी सकाळी आग लागली. या आगीमुळे फ्लॅटमध्ये एक पिता स्वत:च्या दोन अपत्यांसह (मुलगा-मुलगी) अडकून पडला होता. जीव वाचविण्यासाठी या पित्याने स्वत:च्या 10 वर्षांच्या दोन्ही अपत्यांसह बाल्कनीतून उडी घेतली होती. परंतु तिघांचाही मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत यश यादव (35 वर्षे) यांच्यासह त्यांच्या अपत्यांना जीव गमवावा लागला आहे. दिल्ली अग्निशमन दलाला सकाळी 10.01 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली होती. ज्यानंतर त्वरित अग्निशमन दलाने तेथे धाव घेत आग विझविण्याचे काम हाती घेतले होते. आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दोन जण जखमी
या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले होते, ज्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. यातील तीन जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर सध्या दोन जणांवर उपचार सुरू आहेत असे अग्निशमन दलाकडुन सांगण्यात आले. दुर्घटनेत यश यादव आणि त्यांच्या एका मुलाचा अन् मुलीचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा या दुर्घटनेत बचावले आहेत. आग लागल्यावर सोसायटीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आणि वीज तसेच पीएनजी कनेक्शनसारख्या सेवाही बंद करण्यात आल्या.