जयपूरमध्ये ट्रकच्या भीषण अपघाताने अग्नितांडव
राजस्थान
जयपूर येथे एलपीजी गॅस टॅंकरच्या अपघाताने अग्नितांडव झाला. या अपघातात ८ जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर ४१ जण गंभीर जखमी झाले आहेत. जयपूर-अजमेर महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ गॅस वाहून नेणाऱ्या टॅंकरची इतर अनेक वाहनांना धडक बसून हा भीषण अपघात झाला. या आगीत सुमारे ४० हुन अधिक वाहने जळून खाक झाली आहेत. या भीषण अपघातानंतर अजमेर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्थळी बचावकार्य तातडीने सुरू झाले. आग इतकी भीषण होती की लगेच जयपूर शहरातील भांकरोटा परिसरातील पेट्रोल पंपापर्यंत पसरली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सुमारे २० गाड्या आल्या आहेत. पोलिसांनी जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात घटनेतील जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. या आगीत पेट्रोल पंपानजीक उभी असलेली अनेक वाहने जळून खाक झाली.
राजस्थानचे मंत्री जवाहर सिंह बेढम यांनी दिलेली माहिती अशी, की प्रथमदर्शी असे दिसते की ट्रक आणि सीएनजी कंटेनरच्या धडकेत हा अपघात झाला आहे. या घटनेत जीवितहानी झाली आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये जखमींवर तातडीने योग्य ते उपचार करण्यासाठी आसीयु यंत्रणे सज्ज केले आहे. प्रशासन घटनास्थळी कार्यरत आहे. घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकार आवश्यक ती मदत करेल.