आटपाडीत सरकार वाड्यात आग
आटपाडी :
आटपाडी येथील ऐतिहासिक ’सरकार वाड्या’त शनिवारी पहाटे आग लागली. नऊच्या सुमारास उजेडात आलेल्या आगीच्या घटनेने खळबळ माजली. आग आटोक्यात आणण्यासाठी असणारी अपुरी यंत्रणा आणि अडथळ्यांमुळे दोन वाजेपर्यंत खटाटोप सुरू होता. अखेर विटा पालिकेची अग्निशामक यंत्रणा आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.
तत्कालीन औंध संस्थानमधील महत्त्वाचे केंद्र असलेल्या आटपाडीत गावाच्या मध्यभागी सरकार वाडा आहे. कधीकाळी या इमारतीतून संस्थानचे कामकाज चालत होते. त्यानंतर हा सरकार वाडा तहसीलदारांचे निवासस्थान बनले. तर त्याच्या लगत दस्तनोंदणी कार्यालय होते. सध्या सरकार वाडा परिसर पूर्णपणे पडीक असून हे ठिकाण अडगळीचे केंद्र बनले आहे.
शनिवारी सकाळपासून सरकार वाड्याच्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून धूर येत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. नऊच्या सुमारास सरकार वाड्याच्या इमारतीला आग लागल्याचे निदर्शनास आले. याबाबत मुख्याधिकारी वैभव हजारे यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. नगरपंचायत कडील दुचाकीवरील अग्निशामक यंत्रणा, ब्लोअर मशिनने कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
सरकार वाड्यातील इमारतीची झालेली पडझड, अपुरी जागा यामुळे अडचणी निर्माण झाल्या. तरीही स्वच्छतेवर तैनात कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्यासाठी कष्ट घेतले. युवानेते गजानन देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना साथ दिली. महेश देशमुख, चंद्रकांत दौंडे, विकास भुते यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. विकास भुते यांनी ब्रम्हानंद पडळकर यांना याबाबतची कल्पना देवुन आग आटोक्यात आणण्यासाठी महसूल प्रशासनाला जागे करण्याची विनंती केली.
अखेर विटा पालिकेची अग्निशामक यंत्रणा आल्यानंतर विस्तारत चाललेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सरकार वाडा हे एक ऐतिहासिक ठिकाण असून आज ते दुर्लक्षित आणि उपेक्षित बनले आहे. आजही याची मालकी संस्थानच्या प्रतिनिधींकडे आहे. त्यामुळे येथे काहीही करणे अन्य यंत्रणांना शक्य नाही.