दांडेली, न्हावेलीत काजू बागायतीला आग
- चार ते पाच एकरावरील उत्पन्न देणारी कलमे जळाली : शेतकऱ्यांचे नुकसान
न्हावेली / वार्ताहर
दांडेली-वरचावाडा व न्हावेली-रेवटेवाडी येथील सुमारे चार ते पाच एकरावरील काजू बागायतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये 400 ते 500 काजू कलमे जळून खाक झाल्याची माहिती दांडेली ग्रामस्थ अमित नाईक यांनी दिली. दांडेली व न्हावेली सीमाभागात असलेल्या काजु बागायती मधून विद्युत वाहिनी जाते. वासुदेव तुकाराम नाईक, दिलीप हरमलकर, भागीरथी नाईक, हनुमंत परब यांची मिळून 400 ते 500 काजू कलमे जळाली.पाच वर्षे मेहनत घेत, कर्ज काढून काजू कलमे लावली होती. परंतु अचानक लागलेल्या या आगीत अंदाजे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचे अतोनात प्रयत्न केले परंतु सर्व प्रयत्न तोकडे पडले. सदर आग बागेतून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांना शॉर्टसर्किट होऊन लागल्याचा अंदाज शेतकरी अमित नाईक यांनी वर्तविला.आग विझविण्यासाठी वासुदेव नाईक, दिलीप हरमलकर, उदय हरमलकर, राहूल नाईक, दिनेश पेडणेकर, हरी नाईक, ओंमकार पेडणेकर, रमेश पेडणेकर, सिद्धेश नाईक, अमोल परब, बाळू पेडणेकर, तुकाराम नाईक, अमर नाईक आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.