मच्छेनजीक थांबलेल्या ट्रकला आग
स्वयंपाकाच्या छोट्या सिलिंडरने घडली घटना
बेळगाव : जांबोटी रोडवर मच्छेनजीक रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकला आग लागली. स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेल्या लहान सिलिंडरचा स्फोट होऊन ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ट्रकचे केबिन पूर्णपणे जळाले. रस्त्याशेजारी ट्रक उभी करून चालक स्वयंपाक करत होता. लहान सिलिंडरवर भांडे ठेवून तो सामान आणण्यासाठी दुकानाला गेला होता. त्यावेळी सिलिंडर फुटून केबिनने पेट घेतला. वेळीच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे अधिकारी शिवाजी कोरवी, महांतेश शिंगण्णावर, बसवराज पुजेरी, हालसिद्धाप्पा हेगडे, सुरेंद्रसिंग हजारे आदींनी बंबासह घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. बेळगाव ग्रामीण पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही.