शेंडा पार्कमधील जुन्या कुष्ठरोग इमारतीला आग
कोल्हापूर :
शेंडा पार्क येथील कुष्ठरोगी औषध उपचार केंद्राच्या जुन्या इमारतीस सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली. यामध्ये शाहूकालीन इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या घटनेमध्ये इमारतीचा जिना, खिडक्या, लाकडी वासे असे सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. गेल्या 8 महिन्यामध्ये दोन ऐतिहासिक शाहूकालीन वास्तूंना आग लागल्यामुळे इतिहास प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. अग्नीशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले, सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेंडा पार्क परिसरात छत्रपती शाहूमहाराज यांनी उभारलेली इमारत आहे. या इमारतीमध्ये कुष्ठरोगी रुग्णांसाठी औषध उपचार व राहण्याची सोय करण्यात आली होती. सध्या या उपचार केंद्रामध्ये कोणीही रुग्ण नसल्यामुळे ही वास्तु रिकामी पडली आहे. सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अग्नीशमन दलाच्या कावळा नाका नियंत्रण कक्षाला शेंडा पार्क येथील कुष्ठरोग औषध उपचार केंद्रास आग लागल्याची वर्दी मिळाली. यानुसार अग्नीशमन दलाचे टिंबर मार्केट, सासने ग्राउंड मैदान तसेच प्रतिभा नगर येथील अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारसह भिषण आग लागली होती. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मुख्य अग्नीशमन अधिकारी मनिष रणभिसे यांच्या मार्गदर्शनाखाली कावळा नाका स्टेशन ऑफीसर जयवंत खोत, चालक मोहसिन पठाण, गिरीष गवळी, प्रविण ब्रम्हदंडे, उमेश जगताप, प्रमोद मोरे, संदीप व्हनाळीकर, विशाल चौगुले यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
- शाहू महाराजांनी उभारलेली दुसरी वास्तू
ऑगस्ट 2024 मध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाला भिषण आग लागली होती. यामध्ये सुमारे 10 ते 15 कोट रुपयांचे नुकसान झाले होते. यानंतर सोमवारी शेंडा पार्क येथील एwतिहासिक अशा कुष्ठरोग उपचार केंद्रासही आग लागली आहे. या दोनही वास्तू लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी उभारल्या होत्या. या दोनही वास्तू दुर्लक्षीत राहिल्यामुळे दोनीही आगीच्या भक्षस्थानी सापडल्या आहेत. यामुळे इतिहास प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.
- आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान
या आगीमध्ये शेंडा पार्क येथील कुष्ठरोग उपचार केंद्राचे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये इमारतीचा जुना जिना, इमारतीच्या खिडक्या, जुनी भिंत यासह काही कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
- ...तर संपूर्ण इमारतच जळून खाक झाली असती
जुन्या इमारतीला लागलेल्या आगीवर अग्नीशमन दलाने तात्काळ नियंत्रण मिळवले. ही आग जर अन्य खोल्यापर्यंत पसरली असती. तर संपूर्ण इमारतच आगीच्या भक्षस्थानी सापडली असती. अन्य खोल्यांमध्ये लाकूड, तसेच जुनी वैद्यकीय कागदपत्रे तसेच रुग्णांसाठीच्या गाद्या, चादर असे साहित्य होते. यामुळे आणखीनच आग पसरली असती.
- आग लावली की लागली...
या इमारतीला आग लावली आहे की ही आग लागली आहे. याबाबत उलट सुलट चर्चा घटनास्थळी होत्या. या इमारतीमध्ये गांजा ओढण्यासाठी काही तरुण रोज रात्री येतात. त्यांच्याकडून काही कृत्य झाले काय याची चौकशी सुरु आहे.