आंध्रात ओएनजीसी प्रकल्पात भडका
गॅस गळतीनंतर आगीचे तांडव : स्फोटाचा आवाज : तीन गावातील लोकांना हलविले
वृत्तसंस्था/ हैदराबाद
आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिह्यातील ओएनजीसी तेल प्रकल्पातील विहिरीत मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्यानंतर मोठी आग लागली. राजोल परिसरातील इरुसुमांडा गावात सोमवारी ही घटना घडली. दुरुस्तीदरम्यान झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. घटनास्थळी शेकडो फूट उंचीवर आगीच्या ज्वाळा आणि धूर आकाशात उडत असल्याचे पाहून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने हालचाली करत नजिकची तीन गावे रिकामी केली. तसेच लोकांना त्यांच्या घरात वीज किंवा गॅस स्टोव्ह वापरू नयेत अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
आंध्रातील कोनासीमा जिह्यातील राजोल भागात कार्यरत असलेल्या ओएनजीसी तेल विहिरीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली. परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने खबरदारी म्हणून जवळील तीन गावे रिकामी केली. अद्याप कोणताही मृत्यू किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. परंतु परिस्थिती तणावपूर्ण आहे. ओएनजीसी आणि अग्निशमन दलाच्या तज्ञ पथके आग विझवण्यासाठी काम करत आहेत. दुर्घटना घडलेली ही ओएनजीसी विहीर दीप इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे चालवली जाते. 2024 मध्ये ओएनजीसीच्या राजमुंद्री मालमत्तेत उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीला अंदाजे 1,402 कोटींचा ठेका मिळाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दुरुस्ती सुरू असताना तेल विहिरीतून उत्पादन तात्पुरते थांबवण्यात आले होते. याचदरम्यान अचानक एक शक्तिशाली स्फोट होऊन गॅस आणि कच्चे तेल आकाशाच्या दिशेने उडू लागले. काही वेळातच गॅसने पेट घेतला आणि विहिरीजवळ उंच ज्वाळा दिसू लागल्या. इरुसुमांडा आणि आसपासच्या परिसरात गॅस आणि धुराचे दाट ढग पसरल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने लाऊडस्पीकरद्वारे लोकांना वीज बंद करण्याचे, गॅस स्टोव्ह पेटवण्याचे टाळण्याचे आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळण्याचे आवाहन केले.
संपूर्ण परिसर सील
घटनेची माहिती मिळताच ओएनजीसीचे विशेष पथक घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत गॅस गळती आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यादरम्यान संपूर्ण परिसर घेराव घालून सील करण्यात आला होता. पोलीस दलासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि ओएनजीसी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. राज्य प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.