वागातोर येथे हॉटेलला आग
आगीचे नेमके कारण मात्र अस्पष्ट : कर्मचारी माहिती देत नसल्याचा दावा
म्हापसा : वागातोर येथे पेट्रोलपंपजवळ ‘द बायकी रॉयल पर्ल’ या हॉटेलला काल रविवारी रात्री 9.45 वा.च्या दरम्यान आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. म्हापसा व पर्वरी अग्निशामक दलाचे अधिकारी गणेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे 20 लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुमारे दोन तास आगीशी झुंज देत अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझविण्यात यश मिळविले.
आगीचा भडका पाहून पर्वरी अग्निशामक दलाच्या बंबना बोलावून घेण्यात आले. आगीत हॉटेलचे छप्पर जळून खाक झाले आहे. यात वातानुकूलित यंत्रणाही जळून खाक झाली आहे. तसेच हॉटेलचे इतर सामानही जळाले आहे. हॉटेलचा कर्मचारीवर्ग घटनेची माहिती देण्यास तयार नसल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी संताप व्यक्त केला. या हॉटेलात वॉटर हायड्रन्टची व्यवस्था केली नव्हती, अशी माहिती म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी गणेश गावकर यांनी दिली. याबाबत वरिष्ठ अधिकारी हॉटेलची तपासणी करणार आहेत. त्यानंतर या आगीत हॉटेलचे किती नुकसान झाले ते स्पष्ट होणार, असे सांगण्यात आले.