हातकणंगलेत हातमोजे बनविणाऱ्या कंपनीला आग
कोल्हापूर
हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील हातमोजे बनविणाऱ्या कंपनीस आग लागून लाखो रुपायंचे नुकसान झाले. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. नुकसानीचा नेमका आकडा समजला नसल्याने घटनेची प्राथमिक नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.
लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील तुजाई सेफ्टी प्रोडक्ट्स, ब्लॅक रोज इंडस्ट्रीज, अॅटलास प्रोटेक्टिव्ह प्रॉडक्ट या तीन कंपन्या एकाच ठिकाणी असून या कंपन्यांमध्ये हातमोजे बनविण्याचे उत्पादन केले जाते. तिन्ही कंपनींचे कामकाज दोन शिफ्टमध्ये चालत असून जवळपास २०० हून अधिक महिला कर्मचारी काम करतात. कंपनीच्या गोडावूनला शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान अचानक आग लागली. गोडावूनमध्ये तयार हातमोजे असल्याने काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले. लक्ष्मी औद्योगिक वसाहत, इचलकरंजी महानगरपालिका, हातकणंगले नगरपंचायत व पार्वती औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या वाहनांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा परिणाम आगीव झाला नाही.
उलट आग भडकतच राहिली. जवळपास चार तास आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू होते. आगीने रौद्ररूप धारण करताच महिला कामगार वर्गामध्ये भीती निर्माण झाली होती. वर्कशॉपमधील महिला कामगारांना वर्कशॉपमधून बाहेर काढले. पण त्या महिलांना गेटवर अडवून धरण्यात आले होते. आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग लागली की लावण्यात आली याची चर्चा औद्योगिक वसाहतीत सुरू होती. रात्री उशिरापर्यंत धुराचे लोट बाहेर पडत होते. या घटनेची प्राथमिक नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.