गोटे येथे गॅस पाईपच्या गोडावूनला आग
कराड :
गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गालगत हॉटेल फर्न शेजारी असलेल्या गॅस पाईपच्या ढिगाला गुरूवारी दुपारी अचानक आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. आकाशात उठणारे धुरांचे मोठमोठे लोट पाहून महामार्गावरून जाणारी वाहने थांबत होती. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. कराड नगरपालिका व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाईपद्वारे गॅस वितरण करण्यासाठी अनेक दिवसांपासून महामार्गाच्या बाजूने पाईपलाईन करण्याचे काम सुरू आहे. या कामाच्या पाईप्स ठेवण्यासाठी गोटे गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेली मोकळी जागा संबंधित ठेकेदाराने भाडेतत्त्वावर घेतली होती. या मोकळ्या जागेत गेल्या अनेक दिवसांपासून गॅसच्या पाईपचा मोठा ढीग ठेवण्यात आला होता. या ढिगाच्या शेजारी दोन विद्युत ट्रान्सफॉर्मर आहेत.
गुरुवारी दुपारी 1 वाजण्याचा सुमारास ट्रान्सफॉर्मरच्या तारांवर एका वानराने उडी घेतली. यामुळे विद्युततारा एकमेकांना चिकटल्याने शॉर्टसर्किट होऊन मोठ्या प्रमाणात ठिणग्या पडल्या. यामुळे सुरुवातीला पाईपच्या ढिगाशेजारी असलेल्या लहान प्लास्टिक पाईपच्या बंडलने पेट घेतला. त्यानंतर वाऱ्याने ही आग लगतच्या प्लास्टिक गॅस पाईपच्या ढिगाला लागली. तसेच याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कव्हर असलेल्या लोखंडी पाईपही ठेवण्यात आल्या होत्या. या पाईपनीही आग पकडल्याने मोठा भडका उडाला. त्यामुळे थोड्या वेळातच हवेत धुराचे मोठे लोट उसळले.
दरम्यान, आग लागल्याचे निदर्शनास येतात तेथील कामगार व स्थानिक नागरिकांनी तत्काळ कराड नगरपालिका व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमन बंबास पाचारण केले. सुरुवातीला कराड पालिकेच्या अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलचा अग्निशामक बंब दाखल झाला. तसेच कराड पालिकेने पाण्याचा टँकरही मागवला होता. सुमारे पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. तोपर्यंत प्लास्टिकच्या पाईप मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्या होत्या. तसेच लोखंडी पाईपवरील प्लास्टिक कोटिंग जळून गेल्याने या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जळालेल्या पाईपच्या ढिगाशेजारी दोन मोठे जनरेटर होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझविल्याने दोन जनरेटर वाचवण्यात यश आले.
प्लास्टिक पाईप जळाल्याने हवेत मोठमोठे धुरांचे लोट उसळले होते. महामार्गासह कराड शहरातून आकाशात उठणारे धुराचे लोट दिसत होते. यामुळे महामार्गावरून जाणारी वाहने महामार्गावर थांबवून लोक आग बघत होते. यामुळे महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले आहे, याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही.