सावळीत खाद्यतेल गोडाऊनला आग
कुपवाड :
कुपवाड एमआयडीसीजवळ सावळी हद्दीत आरटीओ कार्यालयासमोरील जयमल्हार ट्रेडींग कंपनीच्या खाद्यतेल साठा असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. आगीत गोदामात ठेवलेले खाद्यतेलाने भरलेले पत्र्याचे डबे व बॉक्स जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त केला. सुदैवाने आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही. याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उद्योजक संजय विठ्ठल गरंडे यांच्या मालकीचे सावळी हद्दीत आरटीओ कार्यालयासमोर मोठे गोडाऊन आहे. हे गोडाऊन गरंडे यांनी दिनेश भरत वाघमोडे यांना सात महिन्यापूर्वी भाड्याने दिले आहे. या गोडाऊनमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या खाद्यतेलाचा साठा होता. गुरुवारी रात्री गोडाऊन बंद होते. साडेदहाच्या सुमारास गोडाऊनला अचानक आग लागली. गोडाऊनमधून आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट हवेत पसरू लागल्याने शेजाऱ्यांनी आगीची माहिती गोडाऊन मालक दिनेश गरंडे यांना दिली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाचे बॉक्स व पत्र्याचे डबे भरलेले होते त्यामुळे आग भडकली. गरंडे यांनी कुपवाड एमआयडीसी अग्निशमन विभागाला पाचारण केले. काही तासानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत गोडाऊनमधील खाद्यतेलासह साहित्य जळून खाक झाले होते.