आदिती फुडस् च्या गोदामाला आग
कासेगाव/इस्लामपूर :
वाळवा तालुक्यातील नेर्ले हद्दीतील आदिती फुडस् इंडिया प्रा. लि. या फळप्रक्रिया प्रकल्प मालाच्या गोदामाला गुरुवारी सकाळी 6 वाजता भीषण आग लागली. यामध्ये सुमारे 10 कोटी रुपयांचे तयार खाद्यपदार्थ जळून नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. यंत्रणा झपाट्याने हलल्याने जीवीत हानी न होता सुमारे तीन तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले.
हा फळ प्रक्रिया करणारा उद्योग दिनकरराव पाटील ओझर्डेकर यांचा आहे. या कंपनीत मँगो पल्प, टोमॅटो केचप, चॉकलेट आदी पदार्थांचे उत्पादन केले जाते. यामधील बहुतांशी माल निर्यात होतो. स्थानिक विक्रीसाठी अंदाजे 70 बाय 170 स्केअर फुटाच्या गोदामामध्ये जाम, मॅगो पल्प, सॉसेस, कॅरेट, रिकामे ड्रम ठेवले होते.
गुरुवारी सकाळी 6 वाजता गोदामाला आग लागली. कर्मचाऱ्यांना धुराचे लोट दिसून आले. त्यांनी पाटील यांना तातडीने कळवले. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण करुन संपूर्ण गोदाम वेढले. आगीचे लोळ व धुराचे लोट धडकी भरवणारे होते. दिनकरराव पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुले भगतसिंह व पृथ्वीराज पाटील यांनी पोलीस व अग्निशमन बंबांना संपर्क करुन यंत्रणा राबवली. पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण, इस्लामपूरचे निरीक्षक संजय हारुगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
इस्लामपूर, आष्टा नगरपालिका, राजारामबापू, विश्वास, हुतात्मा किसन अहिर व कृष्णा कारखाना यांच्या बंबांसह खाजगी पाण्याच्या टँकरनी सलग पाण्याचा मारा सुऊ केला. या कंपनीचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे तत्काळ आग अटोक्यात आणणे गरजेचे होते. सकाळची वेळ असल्याने सर्वच यंत्रणा झपाट्याने कामाला लागल्याने तीन तासात आग आटोक्यात आणणे शक्य झाले. दिवसभर पोलिसांकडून आगीचा पंचनामा सुऊ होता.
- यंत्रणेची चांगली मदत
दरम्यान पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, पोलीस यंत्रणेसह, अग्निशमन दलांची यंत्रणा तत्काळ दाखल झाली. त्यामुळे ही भीषण आग काही तासात आटोक्यात आणता आली. त्यामुळे आग अन्यत्र पसरली नाही. तसेच कुठलीही जीवीत हानी झाली नाही.