देसूर क्रॉस येथील कंपनीला शॉर्टसर्किटने आग
लाखो रुपयांचे नुकसान : जीवितहानी टळली
बेळगाव : देसूर क्रॉसनजीकच्या एम. जी. मोटर्स कंपनीतील एका युनिटला शनिवार दि. 1 रोजी दुपारी 3 वाजता आग लागली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आगीची दुर्घटना घडली असून, यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीने पेट घेताच कामगारांनी प्रसंगावधान राखत बाहेर पलायन केल्याने मोठी दुर्घटना टळली. काही वेळानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. सदर कंपनीमध्ये नवीन बसेस तयार केल्या जातात. त्यामुळे तयार केलेल्या बसेस कंपनीच्या आवारात तर काम सुरू असलेल्या बसेस आत वर्कशॉपमध्ये ठेवतात. शनिवारी कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक आगीची घटना घडली. वर्कशॉपमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडल्याचे समजते. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. काहींनी ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर बेळगाव व खानापूर येथून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. आगीने पेट घेताच कामगारांनी बाहेर पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली. सुमारे अडीच तासानंतर आग आटोक्यात आली. गेल्या काही दिवसांपासून बेळगावात सातत्याने आगीच्या दुर्घटना घडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.