कोडगूमध्ये वसती शाळेला आग : विद्यार्थ्याचा मृत्यू
दोघांच्या प्रसंगावधानामुळे 52 विद्यार्थी बचावले, शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज
बेंगळूर : कोडगू जिल्ह्यातील काटीकेरे (ता. मडिकेरी) येथील हरिमंदिर या वसती शाळेला लागलेल्या आगीत एका विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. दोन विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानामुळे 51 विद्यार्थी बचावले. मडिकेरी तालुक्यातील काटीकेरे येथील वसती शाळेत गुरुवारी पहाटे 4 च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेत दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या पुष्पक (वय 7 रा. चेट्टीमानी जि. कोडगू) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी मडिकेरी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. झोपेत असलेल्या बबीन आणि यश्वीन या दोन विद्यार्थ्यांना धुरामुळे जाग आली. त्यांनी आरडाओरड करून सर्व विद्यार्थ्यांना जागे केले.
खोल्यांमधून बाहेर पडण्याची सूचना केली. त्यानुसार सर्व विद्यार्थी दरवाजाच्या दिशेने धावून गेले. मात्र दरवाजा उघडला नाही. त्यामुळे बबीन आणि यश्वीन यांनी मुलांना दुसऱ्या दरवाज्याने शेजारील खोलीत नेऊन बाहेर काढले. परंतु, पुष्पक या बालकाला बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. दोन मुलांनी प्रसंगावधान राखल्याने 51 विद्यार्थी बचावले. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. दिल्लीतील इंडस क्वालिटी एज्युकेशन संस्थेकडून जुन्या घरात ही वसती शाळा चालविण्यात येत होती. घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास केला जात असून संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना कोडगू जिल्हा प्रशासनाने दिली आहे.