For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इचलकरंजीत कापूस गोदामास आग

01:00 PM Mar 23, 2025 IST | Radhika Patil
इचलकरंजीत कापूस गोदामास आग
Advertisement

इचलकरंजी :

Advertisement

येथील सांगली मार्गावरील आसरानगर बस थांब्यासमोरील कापूस गोदामाला शनिवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे 80 लाखांचे नुकसान झाले. इचलकरंजी महापालिका आणि हातकणंगले अग्निशमन दलाच्या 9 बंबांनी पाण्याचा मारा करत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. गोदाम लोकवस्तीजवळ असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

येथील राजर्षी शाहू पुतळा परिसरात राहणारे मणीशंकर केसरवाणी यांचे सांगली मार्गावर आसरानगर बस थांब्यासमोर भाड्याच्या इमारतीत कापूस गोदाम आहे. शनिवारी गोदाम बंद असताना दुपारी साधारण साडेबारा वाजता गोदामातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही माहिती केसरवाणी यांना दिली. घटनेची माहिती मिळताच केसरवाणी आणि त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. गोदामाच्या आत पाहणी केली असता आग लागल्याचे निदर्शनास आले.

Advertisement

केसरवाणी यांनी तातडीने इचलकरंजी महापालिका आणि हातकणंगले अग्निशमन दलाला माहिती दिली. उन्हाच्या तीव्रतेमुळे ज्वलनशील कापसाला लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. धुरामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी गोदामाचे पत्रे फोडून धुराला वाट करून दिली. त्यानंतर 9 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात आली.

गोदाम लोकवस्तीजवळ असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अग्निशमन दलाच्या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

Advertisement
Tags :

.