केंद्रीय मंत्री सुरेश गोपींविरोधात केरळमध्ये एफआयआर
रुग्णवाहिकेत बसून महोत्सवाला पोहोचल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळ पोलिसांनी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी यांच्या विरोधात रुग्णवाहिकेयच दुरुपयोगाच्या आरोपाप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पुरम महोत्सवात गोंधळ झाल्याचे कळताच सुरेश गोपी हे रुग्णवाहिकेतून तेथे पोहोचले होते असा आरोप आहे. त्रिशूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. ज्या वाहनाचा वापर केवळ रुग्णांसाठी होणे अपेक्षित होते, त्याचा वापर केंद्रीय मंत्र्यांनी खासगी प्रवासासाठी केल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात भाकप नेते सुमेश केपी यांनी तक्रार केली होती.
तर महोत्सवात झालेल्या गोंधळाप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी सुरेश गोपी यांनी केली आहे. महोत्सवाच्या ठिकाणी काही तरुणांनी मला वाचवून रुग्णवाहिकेत बसविले होते असा दावा सुरेश गोपी यांनी केला होता. सीबीआयने चौकशी केली तर डाव्या पक्षांचे पूर्ण राजकारण जळून भस्म होईल. सत्य समोर यावे अशी इच्छा असेल तर सीबीआयकडून चौकशी करविण्यात यावी असे आव्हानही त्यांनी दिले आहे.