युके-27 हॉटेल व्यवस्थापनावर एफआयआर दाखल
कॉपीराईट कायद्याचा उल्लंघन केल्याचा आरोप
बेळगाव : कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता नववर्षाच्या स्वागताच्यावेळी बॉलीवूडमधील गाणी वाजविल्यामुळे येथील युके-27 हॉटेलच्या व्यवस्थापनाविरुद्ध कॉपीराईट कायद्यांतर्गत येथील मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उपेंद्र जळगावकर (रा. मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून युके-27 चे जनरल मॅनेजर, इव्हेंट मॅनेजर व इतरांविरुद्ध कॉपीराईट कायदा 1957 कलम 63, 69, 51 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णवर पुढील तपास करीत आहेत. दि. 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री यशराज फिल्मस् प्रा. लि., टिप्स इंडस्ट्रिज लि. व झी एंटरप्रायजेस लि. यांची गाणी वाजवून नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले असून ते पोलिसांना देण्यात आले आहे.