For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म. ए. समिती नेत्यांवर एफआयआर

01:09 PM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
म  ए  समिती नेत्यांवर एफआयआर
Advertisement

परवानगीविना मूक सायकल फेरी काढल्याचा ठपका

Advertisement

बेळगाव : सीमाप्रश्नी सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या म. ए. समितीच्या 150 हून अधिक नेते, कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केट पोलीस स्थानकात सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली असून सायकल फेरीत सहभागी झालेल्या नेते, कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर रोजी मूक फेरीच्या माध्यमातून मराठी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जाण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. कर्नाटकात सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध फेरीत सहभागी होऊन लढा दिला होता. शनिवारी सकाळी महाद्वार रोड येथील छत्रपती संभाजी उद्यानातून फेरीला सुरुवात झाली होती. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. काळ्यादिनाच्या पार्श्वभूमीवर मूक सायकल फेरी काढण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही छत्रपती संभाजी उद्यान परिसरात बेकायदेशीरपणे जमाव जमवून नागरिकांच्या ये-जा करणाऱ्या मार्गावर अडथळा निर्माण करून उपद्रव केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

फेरीत कर्नाटक सरकार व कन्नडिगांच्या भावनेला धक्का पोहोचवणाऱ्या घोषणा देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या बाजूने भाषणे व घोषणा दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या शांततेला भंग पोहोचला आहे. बेळगावसह सीमाभागातील इतर गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे सांगत सरकारतर्फे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण-पाटील, अॅड. अमर यळ्ळूरकर, नेताजी जाधव, अंकुश केसरकर, मदन बामणे, प्रशांत भातकांडे, महेश नाईक, किरण गावडे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, श्रीकांत कदम, चंद्रकांत कोंडुसकर, प्रकाश शिरोळकर, वैशाली भातकांडे आदी 35 जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. एकूण 100 ते 150 जणांवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 189(2), 192, 292, 293, 285, 190 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.