माजी खासदार रमेश कत्तींवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर
वाल्मिकी समाजाचा अवमान केल्याचा आरोप : आज आंदोलन छेडणार
बेळगाव : डीसीसी बँकेची निवडणूक प्रक्रिया शांततेत पूर्ण झालेली असतानाच माजी खासदार रमेश कत्ती यांच्या विरोधात वाल्मिकी समाजाचा अवमान केल्याप्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल झाला आहे. या मुद्द्यावरून निवडणुकीनंतरही वातावरण तापलेलेच असल्याचे दिसून येते. राजशेखर मऱ्याप्पा तळवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश कत्ती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. डीसीसी बँकेचे माजी अध्यक्षही असणाऱ्या रमेश कत्ती यांनी वाल्मिकी समाजाबद्दल अवमानकारक उद्गार काढले आहेत. अर्वाच्च व शिवराळ भाषेत समाजाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील 60 लाख समाजबांधवांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये डीसीसी बँकेसाठी रविवारी मतदान झाले. दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या समर्थकांशी चर्चा करताना जारकीहोळी बंधूंवर टीका करण्याच्या भरात रमेश कत्ती यांनी वाल्मिकी समाजाचा अवमान केला आहे.
यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओच्या आधारावरून राजशेखर यांनी एफआयआर दाखल केला. रमेश कत्ती यांनी केलेल्या समाजाच्या अवमानाविरुद्ध बेळगावसह राज्यात सोमवार दि. 20 ऑक्टोबर रोजी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही राजशेखर तळवार यांनी सांगितले आहे. माजी खासदार रमेश कत्ती यांनीही यासंबंधी एका व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा केला आहे. डीसीसी बँकेच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आपले काही समर्थक डीजे लावून मिरवणूक काढण्यासाठी दबाव आणत होते. त्यावेळी त्यांना ‘बॅड रो’ असे सांगितले आहे. राजकीय दुरुद्देशाने व्हिडिओशी छेडछाड करून आपण वाल्मिकी समाजाच्याविरोधी आहोत, असे बिंबविण्यात येत आहे. आपण या समाजाच्या विरोधात नाही. त्यांचा अवमान करण्याचाही उद्देश नाही. तरीही कोणाला वेदना झाल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो, असे सांगितले आहे.
एफआयआरमुळे राजकीय वातावरण तापले
हुक्केरी येथील वीज संघाच्या निवडणूक प्रचारापासून रमेश कत्ती व जारकीहोळी बंधू यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती. डीसीसी बँकेच्या निवडणुकीतही ती सुरूच राहिली. आता निवडणूक संपल्यानंतर दाखल झालेल्या एफआयआरमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भविष्यात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता गडद झाली आहे.