अथणीच्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध एफआयआर
मध्यस्थीसाठी लाखाची लाच मागितल्याचा ठपका
बेळगाव : आर्थिक व्यवहार मिटविण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या अथणीच्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ माजली असून अलीकडेच राज्य पोलीस महासंचालकांनी पाठवलेल्या पत्राचे पोलीस दलाला गांभीर्य नसल्याचे दिसून येते. रियल इस्टेट व्यावसायिक मीरासाब मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंतराय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एक लाखाची लाच मागितल्यासंबंधी पोलीस निरीक्षकावर एफआयआर दाखल झाला आहे. यासंबंधी आपण पोलीस महानिरीक्षक व पोलीसप्रमुखांना अहवाल पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारी लोकायुक्त पोलीस उपअधीक्षक भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील लोकायुक्त पोलिसांच्या पथकाने अथणीला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली आहे.भूखंड खरेदी व्यवहारातून मीरासाब यांना 20 लाख रुपये यायला हवे होते. यापैकी प्रयत्नांती 15 लाख रुपये मिळाले. उर्वरित 5 लाखांसाठी त्यांनी पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्जानंतर पोलिसांनी संबंधितांना बोलावून समज दिल्याने उर्वरित व्यवहारही पूर्ण झाला. त्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. यासंबंधीचा ऑडिओ मीरासाब यांच्याकडे आहे. त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बुधवारी लोकायुक्तांच्या पथकाने अथणी येथे या प्रकरणाची चौकशी हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर एफआयआर दाखल झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.