For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आदित्यराज’ विरुद्धचा एफआयआर रद्द

11:03 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘आदित्यराज’ विरुद्धचा एफआयआर रद्द
Advertisement

कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय : सीआयडी चौकशीही बारगळणार

Advertisement

बेळगाव : भाग्यनगर येथील आदित्यराज कॅपिटल प्रा. लि. वर छापा टाकून सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात कंपनीच्या संचालकांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द केला असून त्यामुळे प्रशासनाला मोठा धक्काच बसला आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारी नसताना भविष्यात गुंतवणूकदारांची फसवणूक होईल म्हणून अशा अनेक कंपन्यांविरुद्ध चार महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. 1 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदित्यराजची तपासणी करण्याचा आदेश दिला होता. यासाठी प्रांताधिकारी श्रवण नायक यांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस, सहकार व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून पाहणी केली होती.

6 जून रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात आदित्यराजचे प्रमुख बलराज रोहिदास माने व इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केले होते. हे प्रकरण पुढील चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविण्यात आले होते. त्याचवेळी बलराज माने यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांच्या न्यायपीठाने टिळकवाडी पोलीस स्थानकात दाखल झालेला एफआयआरच रद्द केला आहे. जिल्हा प्रशासनाने शिवम असोसिएट्सवरील कारवाईनंतर भरपूर नफा देण्याचे सांगत गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाईचा सपाटाच सुरू केला होता. मात्र, सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेला एफआयआरच न्यायालयाने रद्द केल्यामुळे सीआयडी चौकशीही बारगळणार आहे. न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे, न्यायालयाने आपल्याला न्याय दिला आहे, आपण कोणाचीही फसवणूक केली नाही. त्यामुळेच न्यायालयाने आपली बाजू उचलून धरल्याचे बलराज माने यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.