For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिनेते प्रकाश राज यांच्यावर एफआयआर

10:39 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
अभिनेते प्रकाश राज यांच्यावर एफआयआर
Advertisement

पुरोगामी मेळाव्यात पंतप्रधानांवर जहरी टीका

Advertisement

बेळगाव : ‘देश वाचवा’ संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून भाजपवर टीका करणाऱ्या दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्यासह पुरोगामी नेते, कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. अभिनेते प्रकाश राज, माजी मंत्री बी. टी. ललिता नायक, सामाजिक कार्यकर्ते एस. आर. हिरेमठ यांच्यासह पुरोगामी कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पुरोगामी विचारांच्या संघटनांच्यावतीने येथील गांधी भवनमध्ये ‘देश वाचवा’ संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सुमारे दोनशेहून अधिक जण सहभागी झाले होते. आपली बिगर राजकीय संघटना असल्याचे सांगून कोणत्याही तत्सम प्राधिकरणाकडून मेळाव्याकडून परवानगी घेतली नाही. या मेळाव्यात भाजपविरुद्ध टीका करण्यात आल्याचा ठपका भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत ठेवण्यात आला आहे. बुडाचे नगर रचना अधिकारी व भरारी पथकाचे प्रमुख बसवराज हिरेमठ यांनी मंगळवारी पोलिसात फिर्याद दिली आहे. बिगर राजकीय कार्यक्रमात राजकीय वक्तव्ये करण्यात आली आहेत. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या कार्यक्रमात अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. रेहमत तरीकेरे, रमजान दर्गा, शिवाजी कागणीकर, तारा राव, वरलक्ष्मी, एन. वेंकटेश, श्रीपाद भट आदींसह अनेक पुरोगामी नेते, कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. देश वाचवायचा असेल तर या निवडणुकीत भाजपला मतदान करू नका, असे आवाहन करतानाच प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.